---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या कामावरून दोन गटांमध्ये तीव्र वाद उफाळून आला हा वाद टोकाला गेल्याने या वादाचे रूपांतर थेट हाणामारी व दगडफेकीत झाले. या संपूर्ण घटनेत नशिराबाद येथील दोन्ही गटांतील सुमारे 16 ते 17 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषद निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात दोन गटांमध्ये वाद झाला होता. दरम्यान वाद वाढत गेल्याने दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे नशिराबाद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही गटांतील परस्परविरोधी 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.









