---Advertisement---
महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन अवघे दोन दिवस उलटत नाहीत, तोच सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने इथेच राजकीय समीकरणांची पहिली चाचणी सुरू झाल्याचं चित्र आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील परिस्थितीवर बोलताना मोठा दावा केला आहे. काँग्रेसमधील काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपकडूनच शहराचा विकास होऊ शकतो, अशी भावना त्या नगरसेवकांमध्ये असल्यामुळेच ते संवाद साधत असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. मात्र भाजपसोबत येणारा गट संख्येने भक्कम असावा, यासाठी हे नगरसेवक थोडी वाट पाहत असून आम्हीही प्रयत्न करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या, तरीही पक्षांतर्गत मतभेदांचा फटका बसेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत तणावाचा फायदा भाजप उचलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
निवडणूक निकालांकडे पाहिल्यास, चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसकडे 27 तर भाजपकडे 24 नगरसेवक आहेत. मात्र बहुमताचा आकडा गाठण्यासाठी दोन्ही पक्षांना इतर घटकांची साथ आवश्यक आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. याशिवाय 2 अपक्ष, वंचित बहुजन आघाडीचे 2, बहुजन समाज पार्टीचा 1 आणि एमआयएमचा 1 नगरसेवक आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी अपरिहार्य ठरणार आहेत.
महापौर पदावरून मात्र भाजपची भूमिका स्पष्ट असल्याचं मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कोणत्याही परिस्थितीत महापौरपद दिलं जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. वेळ आली तर भाजप विरोधी बाकावर बसायलाही तयार आहे, पण महापौर भाजपचाच असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मुनगंटीवार यांच्या म्हणण्यानुसार, “जर भाजपचा महापौर असेल, तर अनेक नगरसेवक आमच्यासोबत येण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.” शिवसेना उबाठा गटासोबत दोन वेळा चर्चा झाली असून पहिल्याच बैठकीत महापौरपद कुणालाही सहज देणं शक्य नाही, हे स्पष्ट करण्यात आलं आहे. चंद्रपूर शहराच्या विकासासाठी महापौर भाजपचाच असावा, अशी आमची ठाम भूमिका असल्याचंही त्यांनी नमूद केलं.









