---Advertisement---
जामनेर : नगर परिषद जामनेरची विशेष सभा सोमवार, १९ जानेवारी २०२६ रोजी नगर परिषद कार्यालयात पार पडली. या सभेचे अध्यक्षपद उपविभागीय अधिकारी, जळगाव मा. श्री. विनय गोसावी यांनी भूषविले.
सभेच्या प्रारंभी नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. नितीन बागुल यांनी अध्यक्षस्थानावर विराजमान असलेले अधिकारी, नगराध्यक्षा सौ. साधना गिरीश महाजन, उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे तसेच उपस्थित सर्व नगरसेवक व नगरसेविकांचे स्वागत केले. त्यानंतर सभेची औपचारिक कार्यवाही सुरू करण्यात आली.
या विशेष सभेत शासनाने ठरवून दिलेल्या नियम व कार्यपद्धतीनुसार नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती निवड प्रक्रियेची माहिती सभागृहास सविस्तरपणे देण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया नियमबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली.
सभेदरम्यान नगर परिषदेच्या सर्व विषय समित्यांचे सभापती बिनविरोध निवडून आले. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी श्री. आतिश छगन झाल्टे यांची निवड झाली. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे नेतृत्व डॉ. प्रशांत भागवत भोंडे यांच्याकडे देण्यात आले. स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी श्री. तेजस पाटील यांची नियुक्ती झाली.
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती म्हणून श्री. महेंद्र कृपाराम बाविस्कर यांची निवड करण्यात आली, तर नियोजन व विकास समितीची जबाबदारी श्री. बाबुराव उखर्डू हिवराळे यांच्याकडे सोपविण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. सपना रविंद्र झाल्टे यांची बिनविरोध निवड झाली. दिवाबत्ती समितीचे सभापती म्हणून श्री. सुहास बाबुराव पाटील यांची निवड करण्यात आली.
सभा शांततेत आणि यशस्वीपणे पार पडल्याबद्दल प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे कौतुक करण्यात आले. नवनिर्वाचित सर्व सभापतींना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देत नगर परिषदेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे सर्व सभापती प्रभावी आणि सकारात्मक भूमिका बजावतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.









