---Advertisement---
पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरात घडलेल्या मोबाईल चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत गुन्हे शोध पथकाने काही तासांतच आरोपीला अटक केली. त्याच्याकडून दोन चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले असून अवघ्या १२ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची धुळे येथील सब-जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
ही घटना १८ जानेवारी २०२६ दुपारी सुमारे ३.२५ च्या सुमारास घडली. किशोर आनंदराव नरेराव (वय ३९, रा. कृष्णपुरी, पाचोरा) हे आपल्या चारचाकी वाहनात मोबाईल चार्जिंगसाठी पॉवर बँकला जोडत असताना अज्ञात व्यक्तीने संधी साधून त्यांचा मोबाईल लबाडीने चोरून नेला. या घटनेची तक्रार पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून गुन्हा रजिस्टर क्रमांक २१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) प्रमाणे रात्री ९.२३ वाजता नोंद करण्यात आली.
गुन्हा दाखल होताच पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाला वेग दिला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि परिसरातील हालचालींचे विश्लेषण करत असताना एक संशयित इसम पोलिसांच्या नजरेस पडला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव सौरभ नाना भिल (गायकवाड) (वय २५, रा. कळमसरे, ता. पाचोरा) असल्याचे सांगितले.
पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता आरोपीने मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच पहूर पोलीस ठाणे हद्दीतही अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचे उघड झाले. तपासादरम्यान त्याच्याकडून १५ हजार रुपये किंमतीचा निळ्या रंगाचा शाओमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल (IMEI क्रमांक 8671790518504878) तसेच ५ हजार रुपये किंमतीचा विवो Y27 प्रो असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदर प्रकरणाचे दोषारोपपत्र अवघ्या १२ तासांत पाचोरा न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी धुळे सब-जेलमध्ये करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) कविता नेरकर आणि पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्यासह पोहेकॉ राहुल शिंपी, पोहेकॉ अशोक हटकर, सफौ गणेश पाटील, पोकॉ शरद पाटील व पोकॉ संदीप भोई यांनी या यशस्वी कामगिरीत सहभाग घेतला.









