---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवणारा गंभीर प्रकार समोर आला असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची आर्थिक फसवणूक करत लाखो रुपयांचे वेतन उचलल्याप्रकरणी पाच जणांविरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई इकरा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम अब्दुल मजीद सालार यांच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपींमध्ये उपशिक्षक सैय्यद अमरुल्लाह सैय्यद चाँद कासार, त्यांचे वडील व संस्थेचे उपाध्यक्ष सैय्यद चाँद सैय्यद अमीर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख नईमुद्दीन शेख अफजलुद्दीन, जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र रघुनाथ चौधरी आणि भडगाव उर्दू शाळेतील उपशिक्षक शेख जहीर शेख सलाउद्दीन यांचा समावेश आहे.
नियम धाब्यावर बसवून नियुक्ती…
संस्थेच्या नियमांनुसार पदाधिकारी किंवा त्यांच्या निकटवर्तीय नातेवाइकांना त्याच संस्थेत नोकरी देण्यास स्पष्ट मनाई असताना, उपाध्यक्ष सैय्यद चाँद कासार यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून २०१८ मध्ये आपल्या मुलाची शिक्षक पदावर नियुक्ती केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, नियुक्तीचा मूळ प्रस्ताव प्रलंबित असतानाच बनावट सही व आदेश तयार करून अनुदानित तत्त्वावर मान्यता मिळवण्यात आली. या बनावट आदेशांच्या आधारे शालेय वेतन प्रणालीत नाव नोंदवून शासनाकडून लाखो रुपयांचे वेतन उचलण्यात आले.
या प्रकरणासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, बनावट कागदपत्रांच्या आधारे न्यायालयाची दिशाभूल झाल्याचे तपासात उघड झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे शासनाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.









