---Advertisement---
मनुष्य आयुष्यभर राबराब राबतो.. आयुष्याच्या शेवटच्या टप्पात जमा झालेली पुंजी म्हणजे त्या व्यक्तीचा मोठा आधार… पैसा जपून वापरू या… काटकसर करत पोटाला मारत तो जगत असतो… आणि एक क्षण असा येतो की एका छोट्याशा चुकीमुळे त्याच्या डोळ्यापुढे अंधार येतो… हे काय झाले असे म्हणत… तो हंबरडा फोडतो… पण काही उपयोग नसतो… बँकेत आपला पैसा सुरक्षित आहे, या विश्वासात असलेल्या या व्यक्तीस आलेल्या एका फोन कॉलने, एका लिंकवर किंवा एक ओटीपी सांगितला गेल्यामुळे क्षणार्धात सारी पुंजी नाहीशी होते… ही केवळ एखाद्या व्यक्तीची शोकांतिका नसून जिल्ह्यात वाढती सामाजिक व्यथा ठरत आहे.
सायबर गुन्ह्याचे जाळे एवढे सुक्ष्म आणि व्यापक झाले आहे की, अगदी सुशिक्षीत व्यक्तीही यात गुरफटला जातोय. वृद्ध दाम्पत्यांची अवस्था तर अधिकच बिकट होत चालली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षात बँक अधिकारी असल्याचे भासवणे, केवायसी अपडेटच्या नावाखाली माहिती मिळविणे, फसव्या लिंक पाठविणे, डिजिटल अरेस्टची भीती दाखविणे अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीच्या घटना सातत्याने घडतांना दिसत आहेत. विशेषतः निवृत्त कर्मचारी, पेन्शनधारक, ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक हे या गुन्ह्यांचे प्रमुख लक्ष्य ठरत असल्याचे लक्षात येते. अगदी आयुष्यभर कष्ट करून साठविलेली रक्कम, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आजारपणासाठी बाजुला ठेवलेले पैसे काही क्षणात गायब झाल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या गुन्ह्यांची पार्श्वभूमी पहाता डिजिटल व्यवहारांची झपाट्याने झालेली वाढ, स्मार्टफोनचा वारेमाप वापर मात्र सायबर साक्षरतेचा अभाव हे या प्रकारांमागील प्रमुख कारण ठरत असल्याचे लक्षात येतयं. या प्रकरणांमधील गुन्हेगार मानसशास्त्राचा अचुक वापर करतांना दिसतात. व्यक्तीला भीती दाखवून किंवा वृद्ध नागरिक बयाच वेळेस एकटे असल्याचा फायदा घेत कमी आत्मविश्वास असल्याच्या कारणांमुळे बऱ्याच व्यक्ती या फेऱ्यात अडकतात. सुरक्षेचा विचार करता जिल्ह्यासाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सायबर पोलीस विभाग स्वतंत्ररित्या कार्यरत असला तरी अनेक पीडित तक्रार नोंदविण्यास, तक्रार करण्यात उशीर करतात किंवा लाजेपोटी पुढे येत नाहीत.
जिल्ह्याचा विचार करता असे प्रकार वाढतांनाच दिसत आहेत. प्रशासन यासाठी मोठी जनजागृती करते, मात्र त्याचा फायदा फारसा होतांना दिसत नाही. मागे ७३ वर्षीय सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी अशा प्रकारास बळी पडला होता. तब्बल ३१ लाख ५० हजाराची रक्कम या व्यक्तीकडून गायब केली गेली होती. गुन्हेगारांनी पोलीस अधिकारी आणि सरकारी विभागांची नावे वापरून ही फसवणूक केली. तर एका व्यक्तीला ऑनलाईन शेअर ट्रेडिंग योजना दाखवून एक कोटींपेक्षा अधिक रक्कम काढून घेतली, मात्र त्याने वेळीच तक्रार दिल्यानंतर ५२ लाख रूपये परत मिळाले होते. एका महिलेला ७१ लाख ५ हजार एवढी रक्कम काही अमिषे दाखवून एका स्कॅममध्ये अडकवून फसविले गेले होते. एका इसमाला आम्ही ईडीचे अधिकारी आहोत, असे भासवून १५ लाखांचा गंडा घातला गेला होता. यापेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे सायबर गुन्हेगारांना मदत करणाऱ्या साखळीचा पर्दाफाश माजी महापौरांच्या शेतात करण्यात आला. यात हा पदाधिकारीदेखील पोलिसांच्या ताब्यात अद्याप आहे. यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीशी संबंध असलेले जाळे उघड झाले, ही अतिशय धक्कादायक बाब होय. हे सायबर गुन्हे अदृश्य असले तरी त्याचे परिणाम दुरगामी व अनेकांना आयुष्यातून उठविणारे ठरत आहेत. ज्या कुटुबांवर ही समस्या ओढवते त्यांच्या अवस्थेचे वर्णन करणे अवघडच.
अनेकांना या फसवणुकीनंतर फक्त पैशांचे नव्हे तर आत्मसन्मानाचेही नुकसान सहन करावे लागत असते. आपण इतके मुर्ख कसे ठरलो… हा प्रश्न त्या व्यक्तीस सतत पोखरत रहातो. काही जण तर मुलांना सांगायलाही धजावत नाहीत. भविष्यात आपण त्यांच्यावर ओझे ठरू ही भावना त्यांना मानसिक धक्का देणारी ठरते. केवळ ‘मी बँकेतून बोलतोय’ या शब्दांवर ही व्यक्ती विश्वास ठेवते आणि तेथेच फसते. फसवणुकीच्या या प्रकारांमध्ये तपास यंत्रणाही अधिक बळकट होणे गरजेचे असते. बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन तक्रार करा, म्हटल्यावर ही व्यक्ती अधिकच भांबावून जाते. त्यासाठी मदतीची यंत्रणाही असणे गरजेचे आहे. तात्काळ तक्रार दिल्यास बऱ्याच प्रकरणांचा यशस्वी निपटारा होत असतो. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन जनजागृती करावी व अडचणींत येणाऱ्या या व्यक्तींना मदतीचा हात द्यावा..! कारण आज गरज केवळ प्रगत तंत्रज्ञानाची नाही तर माणुसकीची. प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक समाजघटकाने वृद्धांच्या डिजिटल सुरक्षेची जबाबदारीही स्वीकारली पाहीजे…या व्यक्ती आयुष्यभर आपल्यासाठी जगल्या… आणि तीच व्यक्ती उतारवयात असहाय्यपणे फसविली जात असेल तर तो केवळ त्याचा नाही तर तो आपणा सर्वांचा पराभव आहे. भविष्यात काही घेण्यासाठी मुलांपुढे हात पसरावा लागू नये या त्याच्या स्वप्नांना हा धक्काच… त्यामुळे तो फसविला जाणे…आणि त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसण्याची हिंमत ठेवता आली पाहीजे… आमची तपास यंत्रणा त्या दृष्टीने सक्षम व्हावी… बस… एवढीच अपेक्षा !









