---Advertisement---
जळगाव : सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उताराचे सत्र अजूनही सुरूच असल्याचे सराफा बाजारात पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच दर घसरल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी बाजार उघडल्यानंतर पुन्हा दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून आले.
जळगावच्या सराफा बाजारात मंगळवारी सकाळी व्यवहार सुरू होताच सोन्याच्या दरात वाढ नोंदवली गेली. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा सुमारे ७२१ रुपयांनी वाढला असून जीएसटीसह १० ग्रॅम सोन्याची किंमत जवळपास १ लाख ६५ हजार ६२४ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. याआधी सोमवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्या दिवशी सुमारे १२३६ रुपयांची घट नोंदवली गेल्याने सोन्याचा दर जीएसटीसह १० ग्रॅमसाठी सुमारे १ लाख ६४ हजार ९०३ रुपयांपर्यंत खाली आला होता.
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ दिसून आली आहे. बाजार उघडल्यानंतर चांदीच्या दरात तब्बल १० हजार ३०० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचा दर जीएसटीसह प्रति किलो सुमारे २ लाख ८५ हजार ३१० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्याआधी सोमवारी चांदीच्या दरात सुमारे ८२४० रुपयांची घट झाली होती आणि त्यावेळी चांदीचा दर जीएसटीसह प्रति किलो सुमारे २ लाख ७५ हजार रुपयांपर्यंत खाली आला होता.
दरम्यान, जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचाही परिणाम मौल्यवान धातूंच्या बाजारावर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेषतः मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणाव अद्याप कायम असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. अशा वेळी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून गुंतवणूकदार पुन्हा सोने आणि चांदीकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींचा परिणाम स्थानिक सराफा बाजारावरही होत असून दरात सतत चढ-उतार होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.









