---Advertisement---
छत्रपती संभाजीनगर:
राज्यभरात आज दहावीच्या निकालाची धाकधूक आणि उत्साह असतानाच, छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. परीक्षेत नापास होऊ या भीतीपोटी एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने निकाल जाहीर होण्यापूर्वीच आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोहम ज्ञानेश्वर मोटे (वय १७ वर्षे) असे या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. सोहम हा पुंडलिक नगरमधील गल्ली क्रमांक १० मध्ये आपल्या कुटुंबासह राहत होता. आज (८ मे) दहावीचा निकाल जाहीर होणार होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून “मी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकणार नाही किंवा मला खूप कमी गुण मिळतील,” अशी भीती त्याच्या मनात घर करून बसली होती.
याच मानसिक तणावातून सोहमने आज सकाळी निकाल लागण्यापूर्वीच राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
परीक्षा म्हणजे आयुष्य नव्हे!
सोहमच्या या टोकाच्या पावलामुळे मोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुणपत्रिका किंवा एखादी परीक्षा म्हणजे संपूर्ण आयुष्य नव्हे, हे मुलांना पटवून देण्यात आपण कमी पडत आहोत का? असा गंभीर प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
महत्त्वाचे आवाहन: निकाल कोणताही असो, पालकांनी आपल्या पाल्यांना धीर देणे गरजेचे आहे. अपयश ही आयुष्याची अखेर नसते. कोणत्याही विद्यार्थ्याने टोकाचा विचार न करता आपल्या समस्या पालकांशी किंवा शिक्षकांशी बोलून दाखवाव्यात.









