---Advertisement---
पत्रकारांना कथितरित्या अश्लाघ्य शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणावरून नशिराबाद पत्रकार संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना निवेदन देत संबंधित खासदार संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील घडामोडी वस्तुनिष्ठपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. अशा परिस्थितीत पत्रकारांना अपमानास्पद भाषा वापरून शिवीगाळ करणे किंवा जीवे मारण्याच्या धमक्या देणे हे केवळ पत्रकारांचा अवमान नसून प्रसारमाध्यमांच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधींनी संविधानिक मूल्यांचा सन्मान राखत लोकशाही संस्थांप्रती जबाबदारीने वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारचे वर्तन निषेधार्ह असल्याचे पत्रकार संघाने स्पष्ट केले. पत्रकारांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाही व्यवस्थेस घातक असून अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी निवेदन स्वीकारून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल आणि नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. या प्रसंगी नशिराबाद पत्रकार संघाचे सुनील भावसार, प्रा. विश्वनाथ महाजन, चंदन पाटील, हरीश पाटील, सुनील महाजन, सागर मोरे, राजेंद्र पाटील, नितीन नांदुरकर यांच्यासह संघाचे अनेक पत्रकार उपस्थित होते.









