---Advertisement---
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या संत-महंतांच्या बैठकीत या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहणाने कुंभपर्वाची सुरुवात होणार असून हा धार्मिक सोहळा 24 जुलै 2028 पर्यंत चालणार आहे.
कुंभपर्वातील सर्वाधिक महत्त्वाचे अमृत स्नान (शाही स्नान) पुढीलप्रमाणे असतील:
- 2 ऑगस्ट 2027 – पहिले अमृत स्नान
- 31 ऑगस्ट 2027 – दुसरे अमृत स्नान
- 11 सप्टेंबर 2027 – तिसरे अमृत स्नान (नाशिक)
- 12 सप्टेंबर 2027 – तिसरे अमृत स्नान (त्र्यंबकेश्वर)
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, साधूग्राम, पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू असून बहुतेक प्रमुख प्रकल्प मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
कुंभमेळ्यादरम्यान देश-विदेशातून कोट्यवधी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दाखल होण्याची अपेक्षा असून प्रशासनाने सुरक्षा, वाहतूक आणि मूलभूत सुविधांसाठी व्यापक नियोजन सुरू केले आहे.









