---Advertisement---
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाचे सुशोभीकरण सुरू असताना संकुलातील बास्केटबॉल कोर्ट व लॉन टेनिस मैदानाची दुरुस्ती आणि सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी युवासेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
सध्या जिल्हा क्रीडा संकुलात विविध विकासकामे सुरू असून संकुलाच्या दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात असलेले बास्केटबॉल कोर्ट आणि लॉन टेनिस मैदान वर्षानुवर्षे विविध स्तरावरील स्पर्धांसाठी वापरले जाते. मैदानालगत आकर्षक ॲथलेटिक्स रनिंग ट्रॅक तयार करण्यात आला असला तरी बास्केटबॉल व लॉन टेनिसचे मैदान जुने व नादुरुस्त अवस्थेत असल्याचे युवासेनेने निदर्शनास आणून दिले.
खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी यासाठी या मैदानांची तातडीने दुरुस्ती करून सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी युवासेना उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना कॉलेज कक्ष लोकसभा युवाधिकारी प्रितम शिंदे, संदीप सूर्यवंशी, अजय खैरनार, राहुल चव्हाण, पियुष हसवाल, लोकेश पाटील, कार्तिक खैरनार, गणेश भोई आदी पदाधिकारी उपस्थित होते.









