---Advertisement---
जळगाव तालुक्यातील निमखेडी येथे धक्कादायक घटना घडली. एका पतीनेच आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. दिपाली नितीन सोनवणे असं मृत महिलेचं नाव असून, नितीन सोनवणे असं आरोपी पतीचं नाव आहे. हातमजुरी करून उदरनिर्वाह करणारा नितीन आपल्या पत्नी दिपाली, दोन मुलं आणि एका मुलीसोबत राहत होता. मात्र, मागील काही वर्षांपासून त्यांच्या संसारात सतत वाद सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील चार वर्षांपासून पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होत होती. दोघं अनेक वेळा वेगळं राहिले होते. दिपाली ही अनेकदा घर सोडून जायची, त्यामुळे दोघांमधील वाद अधिकच वाढत गेले. आणि याच वादाचा शेवट इतका भयानक होईल, याची कल्पना कुणालाही नव्हती.
गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी साधारण साडेतीन वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. वाद इतका वाढला की, त्याचं रूपांतर झटापटीत झालं. संतापाच्या भरात नितीन सोनवणे याने आपला ताबा गमावला आणि अत्यंत टोकाचं पाऊल उचललं.
त्याने आधी दिपालीच्या डोक्यावर विटांनी हल्ला केला आणि त्यानंतर लोखंडी विळ्याने तिच्या मानेवर आणि पोटावर वार करत तिची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यानंतर दिपाली घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. घरभर रक्त सांडलेलं होतं… आणि सणाचा दिवस एका क्षणात शोकांतिकेत बदलला.
धक्कादायक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपी नितीन सोनवणे स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गेला. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला आणि दिपालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेत सर्वात वेदनादायक बाब म्हणजे या कुटुंबातील मुलांचं भवितव्य. नितीन आणि दिपाली यांच्या पश्चात दोन मुलं आणि एक मुलगी आहे. एका क्षणात आईचा मृत्यू झाला आणि वडील पोलिसांच्या ताब्यात गेले… त्यामुळे या तिन्ही निरपराध मुलांचं आयुष्य आता पूर्णपणे बदलून गेलं आहे.
याशिवाय, आरोपीची आई ही वयोवृद्ध असून एका डोळ्याने अंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.









