---Advertisement---
रावेर, यावल, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर व इतर तालुक्यांतील सुमारे ३० हजार हेक्टरवरील केळी बागा अतितापमान, तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्ण वाऱ्यांच्या तडाख्याने होरपळून गेल्या आहेत. जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाने ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केल्याने रावेर, यावल, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर आदी तालुक्यांतील सुमारे ३० हजार हेक्टरवरील केळी बागांना अतिउष्णतेचा मोठा फटका बसला आहे. तीव्र सूर्यप्रकाश, उष्ण वारे आणि सतत वाढणाऱ्या तापमानामुळे केळीची पाने करपणे, घडांचे नुकसान होणे तसेच झाडे सुकण्याचे प्रमाण वाढले आहे.
जळगाव जिल्ह्यात मृगबाग आणि कांदेबाग या दोन प्रमुख हंगामांत केळीची लागवड केली जाते. सध्या मृगबाग काढणीच्या टप्प्यात असून कांदेबाग वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र, एप्रिलपासून सातत्याने वाढलेल्या तापमानामुळे दोन्ही प्रकारच्या बागांवर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तज्ज्ञांच्या मते, केळी पिकासाठी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान पोषक मानले जाते. ४० अंशांपेक्षा अधिक तापमान पिकासाठी घातक ठरते. यंदा उष्णतेसोबत गरम वाऱ्यांचा वेगही वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
अतितापमानामुळे केळीच्या पानांवर चिरा पडत असून प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर परिणाम होत आहे. झाडांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढल्याने पाने करपण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी घडांवरील फण्या उन्हामुळे काळवंडत असून घड सटकणे, दांडे काळे पडणे आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. फळांच्या सालीवर काळे डाग पडत असल्याने बाजारात दर्जा घसरून व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.
उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असल्याने केळी पिकासाठी पाण्याची मागणीही वाढली आहे. मार्च महिन्यात एका झाडाला १४ ते १६ लिटर पाणी लागत होते, तर मे महिन्यात ही गरज २१ ते २४ लिटरपर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यात बहुतांश शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करत असले तरी पाण्यावरील ताण वाढत चालला आहे. काही शेतकरी बागांचे संरक्षण करण्यासाठी शेडनेट, हिरवे पडदे तसेच जुन्या साड्यांचा वापर करून उष्ण वाऱ्यांपासून झाडांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, जळगाव येथील केळी संशोधन केंद्राने शेतकऱ्यांना वारा रोधक कुंपण उभारण्याचा सल्ला दिला आहे. बागेभोवती शेवरीची लागवड करणे, शेडनेटचा वापर करणे तसेच ऊसाचे पाचट, गव्हाचा भूसा किंवा सोयाबीनच्या अवशेषांचे आच्छादन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होत असून बाष्पीभवनाचा वेग कमी होतो, असे संशोधन केंद्राने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने हवामान आधारित पीक विमा योजनेतून मदत मिळण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. जिल्ह्यातील कृषी विभागाकडून नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेतला जात असून पुढील काही दिवस तापमानात घट न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









