जळगाव जिल्हा दिव्यांग समितीची आढावा बैठक; कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण

---Advertisement---

 

जिल्हा दिव्यांग समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत दिव्यांग कल्याणाशी संबंधित विविध योजनांची सखोल समीक्षा करण्यात आली.

बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगोळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील, नगरपालिका सहआयुक्त जनार्दन पवार, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्यासह विविध दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद सेस २०२५-२६ अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्याअंतर्गत जिल्ह्यातील मान्यताप्राप्त कर्णबधीर शाळांमधील ३४६ विद्यार्थ्यांना एकूण ६९२ कर्णयंत्रे देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. या योजनेसाठी सुमारे ५३ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. प्रतीकात्मक स्वरूपात पाच विद्यार्थ्यांना कर्णयंत्रे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेत सुधारणा होऊन त्यांच्या शिक्षणात आणि दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा उद्देश आहे.

बैठकीदरम्यान जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच त्यासमोरील अडचणींची चर्चा झाली. यूडीआयडी कार्ड वितरणाची सद्यस्थिती, प्रलंबित अर्जांची संख्या आणि त्यांचा निपटारा गतीने करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही विचारविनिमय करण्यात आला. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यूडीआयडी प्रमाणपत्र पडताळणीची स्थिती देखील तपासण्यात आली.

याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांकडील दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधीच्या वापराचा आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन समितीअंतर्गत १ टक्के निधी आणि विविध विकासकामांची माहिती सादर करण्यात आली. मर्यादित व कायदेशीर पालकत्वाशी संबंधित प्रकरणे, शासकीय इमारतींमध्ये सुगम्यता वाढविण्यासाठी आवश्यक उपाय, तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या अंमलबजावणीवरही चर्चा झाली.

समावेशक आणि सक्षम समाज घडवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी घुगे यांनी अधोरेखित केले. दिव्यांग नागरिकांना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक प्रभावीपणे कार्य करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---