परीक्षा वेळापत्रकावरून निर्माण झालेला वाद मिटला, एनमुक्टोच्या बैठकीनंतर परीक्षा कालावधीत कपात करण्याचा विद्यापीठाचा निर्णय

---Advertisement---

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा वेळापत्रकावरून निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. एनमुक्टो प्राध्यापक संघटनेने विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत प्रस्तावित आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

२९ मार्च २०२६ रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंशी भेट घेत सुमारे दोन तास सविस्तर चर्चा केली. या चर्चेत परीक्षा ३० मे २०२६ पर्यंत लांबण्यामागे परीक्षा विभागाकडून झालेल्या त्रुटींची कबुली कुलगुरूंनी दिली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे वेळापत्रकात तत्काळ मोठे बदल करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षा पुढे ढकलल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात, तसेच अचानक बदल केल्यास गोंधळ उडू शकतो, असे सांगत प्राध्यापकांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी केली.

या पार्श्वभूमीवर परीक्षा विभागाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांच्या सुट्ट्यांवर परिणाम झाल्याची नोंद घेत, केवळ कुलगुरूंच्या आवाहनाचा मान राखत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून संघटनेने आंदोलन मागे घेतले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या जातील आणि भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी योग्य नियोजन केले जाईल, अशी हमी प्रशासनाने दिली.

दीर्घ चर्चेनंतर परीक्षा कालावधी कमी करण्याबाबत सहमती झाली. आधी ३० मेपर्यंत वाढवलेला कालावधी आता २२ मे २०२६ पर्यंत मर्यादित करण्यात आला असून सुमारे ८ ते ९ दिवसांची कपात करण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.

दरम्यान, शैक्षणिक नियमांनुसार असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमध्येही बदल करण्यात आला आहे. पूर्वी ६ मे ते १५ जून असा असलेला कालावधी आता १५ मे ते २३ जून २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे.

या चर्चेत कुलगुरू प्रा. डॉ. विजय महेश्वरी, प्र-कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्यासह एनमुक्टोचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. नितीन बाविस्कर, सहसचिव डॉ. विजय सोनजे, तसेच जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सुमारे ५५ ते ६० सदस्यांनीही सहभाग घेतला.

यापूर्वी संघटनेने दिलेल्या निवेदनात उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात परीक्षा घेण्याचा निर्णय हा नियमबाह्य असल्याचे नमूद करत वेळापत्रक रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच नियोजनातील त्रुटींवर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही करण्यात आली होती.

संपूर्ण घडामोडींनंतर विद्यापीठ प्रशासनाने काही प्रमाणात बदल स्वीकारत परीक्षा कालावधी कमी करण्याचा मार्ग निवडला आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत होत असून, प्राध्यापकांच्या हक्कांसाठी लढताना विद्यार्थ्यांचाही विचार करणारी संघटना म्हणून एनमुक्टोची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---