---Advertisement---
Dhule News : सिटी सर्व्हे विभागातील कामकाजात होत असलेला विलंब, नोंदणी प्रक्रियेत दिसणाऱ्या त्रुटी आणि त्याचा शासनाच्या महसुलावर होत असलेला परिणाम याबाबत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, धुळे शाखेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चेअरमन इंजिनिअर अक्षय प्रमोद मुंडके यांच्या नेतृत्वाखाली महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन देण्यात आले.
असोसिएशनच्या मते, सिटी सर्व्हे विभागातील नोंदींमध्ये अनेक विसंगती आढळून येत आहेत. टाउन प्लानिंगकडून मंजूर लेआऊट, प्रत्यक्ष जागेची मोजणी, ७/१२ उतारा आणि अधिकृत भू-अभिलेख यामध्ये सुसंगती असतानाही सिटी सर्व्हे रेकॉर्डमध्ये तफावत दिसते. या विसंगतीमुळे मालमत्ता खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
नाव नोंदणीची प्रक्रिया कायद्यानुसार १५ दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ती दीर्घकाळ प्रलंबित राहते, अशी तक्रार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, सामीलिकरणाची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण व्हायला हवी असताना ती एक ते दोन वर्षे चालू राहते. तलाठी कार्यालयातून पाठवलेल्या प्रकरणांनाही वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवले जात असल्याचे असोसिएशनने निदर्शनास आणले.
या सर्व विलंबाचा परिणाम केवळ व्यवहारांवरच नाही, तर बांधकाम प्रकल्पांवरही होत असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले. परिणामी शासनाच्या महसुलातही घट होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.
निवेदनात काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने संयुक्त बैठक घ्यावी, नोंदणी व सामीलिकरण प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा काटेकोरपणे लागू करावी, प्रलंबित प्रकरणे सोडवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि अभिलेख व्यवस्थापनासाठी एकसंध डिजिटल प्रणाली लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, उपजिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत संबंधित अडचणींबाबत ठोस पुरावे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार, बिल्डर्स असोसिएशनने नागरिकांना आवाहन केले आहे की, सिटी सर्व्हे विभागात प्रलंबित असलेल्या प्रकरणांशी संबंधित अर्ज, ७/१२ उतारा, सिटी सर्व्हे उतारा आणि मंजूर लेआऊट यासारखी कागदपत्रे सादर करावीत. यासाठी ९३५९३९१४०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या वेळी असोसिएशनचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. त्यामध्ये सुनील मुंदडा, नितिन खिवसरा, संजय पाटील, भारत वाघ, संजय देसले, शीतल नवले, कुणाल सोनार, दिपक अहिरे, आशिष अग्रवाल, अक्षय मुंडके, आनंद बाळापुरकर, दिपक शेलार, पंचम मोरे, संदीप सैंदाणे, शेषराज जाधव, अविनाश थोरात, देवेंद्र कट्यारे, गोपाल शर्मा, अजिंक्य शर्मा, अनिमेश चांदसरकर, दिपक भामरे, सुश्रुत जोशी आणि सागर मुळे यांचा समावेश होता.









