‘आर्टेमिस २’ने मोडला ५६ वर्षे जुना विक्रम, पोहोचले चार लाख किमीपेक्षा जास्त दूर, चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने पृथ्वीवर परतणार

---Advertisement---

 

वॉशिंग्टन : नासाच्या ‘आर्टेमिस २’ ने पृथ्वीपासून सर्वाधिक दूर प्रवास करून मानवी अंतराळ मोहिमेचा विक्रम मोडला आहे. हा विक्रम १९७० मध्ये ‘अपोलो १३’ मोहिमेत झाला होता. ‘अपोलो-१३’चा विक्रम पृथ्वीपासून ४ लाख १७१ किमी अंतराचा होता. आर्टेमिस २ च्या चार अंतराळवीरांनी ६ एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ११.२६ वाजता हा विक्रम मोडला.

चंद्राच्या मागे उड्डाण करताना ओरियन स्पेसक्राफ्ट पृथ्वीपासून आपल्या कमाल अंतरावर पोहोचले. नासाच्या मते, पृथ्वीपासून त्याचे अंतर सुमारे ४०६७७१ किमी झाले. स्पेसक्राफ्ट चंद्राच्या सर्वात जवळही पोहोचले. यावेळी चंद्रापासूनचे अंतर केवळ ६५४५ किमी राहिले. आता हे अंतराळवीर पृथ्वीकडे परतण्याच्या मार्गावर आहेत. पृथ्वीपासून सर्वाधिक दूर जाण्याचा विक्रम मोडताच अंतराळवीरांनी एकमेकांना मिठी मारली. ‘आर्टेमिस २’ मिशनने अपोलो १३ चा अंतराचा विक्रम मोडताच, कॅनेडियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर जेरेमी हॅन्सन यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि क्रूच्या वतीने एक सूचनाही केली.

हॅन्सन यांनी त्यांच्या टीमच्या वतीने चंद्रावरील दोन नवीन क्रेटर्सना नावे देण्याची विनंती केली. ओम क्रेटरजवळील क्रेटरला इंटीग्रिटी असे नाव देण्यात यावे. तर, ग्लुश्को नावाच्या एका चमकदार क्रेटरजवळील खड्याला आर्टेमिस २ चे कमांडर रीड वाईसमन यांच्या दिवंगत पत्नीच्या सन्मानार्थ कॅरोल असे नाव देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. नासाने आर्टेमिस २ च्या चार सदस्यांना चंद्राच्या पृष्ठभागावरील ३० विशेष लक्ष्यांची यादी पाठविली होती. यांचे त्यांना छायाचित्रण करायचे होते.

यापैकी सर्वात प्रमुख ‘ओरिएंटल बेसिन’ आहे. हा खोलगट भाग ३.८ अब्ज वर्षांपूर्वी उल्कापिंडाच्या धडकेमुळे तयार झाला होता. त्यांनी ‘हर्ट्जस्प्रंग बेसिन’चा देखील अभ्यास केला. यामुळे त्यांना चंद्राचा पृष्ठभाग वेळेनुसार कसा बदलला हे समजू शकणार आहे.

११ एप्रिलला पृथ्वीवर परतणार

भारतीय वेळेनुसार ११ एप्रिल रोजी सकाळी ५.३० वाजता ओरियन पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल. ५.३६ वाजता हे सॅन डिएगोजवळ प्रशांत महासागरात ‘स्प्लॅशडाऊन’ करेल. यानंतर ह्यूस्टनमध्ये एक पत्रपरिषद होईल. यात मोहिमेची माहिती दिली जाईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---