सह्याद्री अतिथीगृह येथे पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न; कांदा प्रक्रिया व साठवणुकीबाबत उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना

---Advertisement---

 

महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे कांदा उत्पादक राज्य असून येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. देशातील सुमारे ७० टक्के कांदा स्थानिक वापरासाठी जातो, तर उर्वरित ३० टक्के उत्पादन अतिरिक्त राहते. या अतिरिक्त कांद्याचे योग्य प्रकारे मूल्यवर्धन करण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. कांदा पावडर आणि चिप्ससारखी उत्पादने तयार करून त्यांची विक्री देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टप्प्याटप्प्याने करता येऊ शकते, असे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमात महिला बचत गटांचा सहभाग वाढवण्यावरही भर देण्यात आला.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक तसेच महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाचे संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव, मे. एस-४-एस टेक्नॉलॉजीजचे प्रतिनिधी अश्विन पावडे आणि प्रकल्प उपसंचालक संजय पिंगट यांची यावेळी उपस्थिती होती.

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन अशा उद्योगांना चालना दिल्यास केवळ उत्पादनाचे व्यवस्थापन सुलभ होणार नाही, तर ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीलाही गती मिळेल. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची अपेक्षा पणन मंत्री जयकुमार रावळ यांनी व्यक्त केली.

राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्यास बाजारभाव घसरून शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो, तर भाव वाढल्यास ग्राहकांमध्ये नाराजी वाढते. या दोन्ही टोकांच्या परिस्थितीवर तोडगा म्हणून प्रक्रिया उद्योग प्रभावी ठरू शकतात, असे स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, मे. एस-४-एस टेक्नॉलॉजीजकडून प्रस्तावित प्रकल्पाची तांत्रिक माहिती सादर करण्यात आली. हा प्रकल्प जास्तीत जास्त क्षमतेचा असावा, जेणेकरून अधिकाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच सौरऊर्जेवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास प्रकल्प अधिक कार्यक्षम ठरेल, असे नमूद करत त्यानुसार सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---