---Advertisement---
“उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत हा निव्वळ आरोप, सत्ता असूनही एकनाथ शिंदे अस्वस्थ”
मुंबई/जळगाव: राज्याच्या राजकारणात सध्या ‘फोडा, तोडा अन् राज्य करा’ हीच नवी फॅशन झाली असल्याची बोचरी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना वेळ देत नव्हते हा निव्वळ आरोप असून, सध्या हातात सत्ता असूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अस्वस्थ असल्याचा मोठा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका करताना ते म्हणाले की, राज्यात विरोधकांना फोडण्याचे आणि पक्ष तोडून स्वार्थ साधण्याचे राजकारण सुरू आहे. इंग्रजांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचाच अवलंब आता नव्या फॅशनच्या रूपात केला जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
शिंदेंच्या ‘त्या’ आरोपावर पलटवार:
शिवसेनेत फूट पडताना आणि महाविकास आघाडी सरकार कोसळताना, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेते आणि आमदारांना भेटण्यासाठी वेळ देत नव्हते, अशी प्रमुख तक्रार एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी केली होती. यावर वडेट्टीवारांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. “उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत हा केवळ एक आरोप होता आणि त्यात कोणतेही तथ्य नव्हते. केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हा आरोप करण्यात आला,” असे वडेट्टीवार म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “आज एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रिपद आणि संपूर्ण सत्ता आहे. मात्र, सर्व काही हातात असूनही ते आतून प्रचंड अस्वस्थ आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.









