---Advertisement---
जळगाव : मुंबईतील दादर येथील प्रतिष्ठित अमर हिंद मंडळ या ऐतिहासिक सामाजिक-सांस्कृतिक संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ साठी जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठान यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यभरातील एकूण ९२ संस्थांमधून उत्कृष्ट सामाजिक कार्याच्या आधारे केवळ पाच संस्थांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये केशवस्मृती प्रतिष्ठानचा मानाचा समावेश आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक एकात्मता आणि जनजागृतीच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या मंडळाची स्थापना २६ जानेवारी १९४७ रोजी झाली असून, गेली अनेक दशके व्याख्यानमाला, सांस्कृतिक उपक्रम, क्रीडा व सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
‘अमर ऊर्जा पुरस्कार’ हा समाजोपयोगी व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या संस्थांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा सन्मान असून यंदा या पुरस्काराचे पाचवे वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे.









