विहिरीत पडलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू, वनविभागाच्या दिरंगाईवर ग्रामस्थांचा संताप

---Advertisement---

 

Pachora News : पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या वडगाव जोगे शिवारातील शेतातील विहिरीत पडल्याची घटना घडली. दरम्यान, ग्रामस्थांनी तत्परतेने प्रयत्न करूनही वनविभागाच्या कथित विलंबामुळे त्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव जोगे शिवारातील शेतकरी दिलीप काशिनाथ पवार यांच्या शेतातील विहिरीत आज सकाळच्या सुमारास बिबट्या पडलेला आढळून आला. परिसरात बिबट्या आढळल्याची माहिती मिळताच आंबे वडगावचे सरपंच बबलू तडवी, ॲड. मंगेश गायकवाड तसेच अनेक ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत पडलेला बिबट्या पाण्यात तग धरून राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. बिबट्याला बुडण्यापासून वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी तात्काळ पुढाकार घेत विहिरीतील पाणी मोटारद्वारे उपसण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांच्या या प्रयत्नांमुळे काही काळ बिबट्याचा जीव वाचण्याची आशा निर्माण झाली होती.

दरम्यान, या घटनेची माहिती तातडीने पाचोरा वनविभागाला देण्यात आली. मात्र, वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आल्यानंतरही परिस्थितीची तातडी ओळखून त्वरीत कार्यवाही केली नाही. काही कर्मचारी मोबाईलवर फोटो काढत, गप्पा मारत बसले होते. त्यानंतर बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा व अतिरिक्त कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत जवळपास तीन तासांहून अधिक वेळ निघून गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात वनविभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सामाजिक कार्यकर्ते दिलीप जैन यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.

लाकूडतोड्यांचा वावर वाढला

स्थानिक नागरिकांच्या मते, पाचोरा, शेंदुर्णी व भडगाव तालुक्यातील राखीव जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असून लाकूडतोड्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी पाण्याच्या व अन्नाच्या शोधात गावाकडे व शेतीकडे वळत असल्याचे प्रकार वाढत आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन्यजीव संरक्षणाबाबत प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोर्षीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---