---Advertisement---
शिक्षण हे अज्ञानरूपी अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सर्वात प्रभावी मार्ग होय. ‘माझी शाळा’ दोन शब्द उच्चारले तरी मन गर्वाने भरून येते… ते शिक्षक, तो वर्ग ते बालमित्र या सर्वाची गोळाबेरीज आठवर्णीनी उर भरून येते… माझा विद्यार्थी घडला पाहीजे ही जीद्द आज फार कमी दिसते… अंधारात एखादा प्रकाशाचा किरण असतोच असतो. शिक्षण क्षेत्राशी संबंधीत दोन घटना या जिल्ह्यात घडल्या. एकीकडे जळगाव तालुक्यातील पाथरी येथील शिक्षिका उज्ज्वला सावकारे यांच्या बदली विरोधातील विनवण्या तर दुसरीकडे धरणगावात एका शिक्षकाने विद्यार्थिनीवर केलेला अत्याचार. या दोन्ही घटना आपल्या शिक्षण व्यवस्थेतील खोलवर दडलेल्या विरोधाभासाचे जिवंत उदाहरण ठरतात. एका बाजुला पाथरी येथील शिक्षिका उज्ज्वला सावकारे यांच्यासाठी गावातील पालक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक जिल्हाधिकारी घुगे यांच्याकडे जाऊन बदली रद्द करा म्हणून विनवण्या करत होते पण त्यांची दाद घेतली गेली नाही. विषय जिल्हा परिषदेकडील म्हणून त्यांची बोळवण झाली. शिक्षिका सावकारे एक कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षिका आहेत. त्यांची बदली म्हणजे एक व्यक्ती एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे नव्हे तर अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम करणारा निर्णय होय. आमचा समाज आजही चांगले शिक्षण देणाऱ्या शिक्षकाला जपतो त्याला मान देतो त्याच्यासाठी उभा रहातो हाच खरा आशेचा किरण आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या काही ठराविक कालावधीनंतर बदल्या होतात. हा नियम आहे… इथपर्यंत ठिक मात्र प्रत्येक विभागासाठी हा नियम लागू असताना पाळला जोतो का? याच जिल्हा परिषदेतील काही टेबल असे आहेत की तेथील अधिकारी दोन-तीन नव्हे तर तब्बल २० ते २५ वर्षांपासून एकाच टेबलावर काम सांभाळून आहेत याचे कारण ती व्यक्ती म्हणजे अधिकाऱ्यांचा पंटर म्हणून ओळखली जाते. या वर्गाला अभय दिले जाते… बदली केली तरी त्याच व्यक्तीकडे कार्यभार ठेवला जातो यामागील अर्थपूर्ण चर्चा नेहमी दबकच सुरू असतात. विद्यात्र्त्यांचे भवितव्य व मागणी लक्षात घेऊन त्या शिक्षिकेला जर त्याच गावात ठेवले तर काय फरक पडू शकतो? याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे वाटते. दुसरी घटना धरणगावची मन सुन्न करणारा हा प्रकार होय. शिक्षक या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना केवळ गुन्हा नाही तर विश्वासघात आहे. ज्यांच्या हातात विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी दिली त्याच हाताने विद्यार्थीनीच्या आयुष्यावर घालण्याचा प्रकार यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती असू शकते? हाच विरोधाभास आपल्या व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित करतो.
एकीकडे चांगल्या शिक्षकांसाठी लोक रस्त्यावर उतरतात तर दुसरीकडे एका नराधम शिक्षकाला गाव चोप देते. अशा विकृत प्रवृत्तीचे लोक शिक्षण क्षेत्रात कसे टिकून रहातात? त्यांच्या वर्तनावर वेळेवरच नियंत्रण कसे येत नाही. याला व्यवस्थेतील त्रुटी देखील अवलंबून आहेत. काही वर्षे असा प्रकार होत असेल तर तो लक्षात कसा येऊ नये ? अशा घटनांचा आपण केवळ निषेध करून थांबणार आहोत का की त्यापुढे पावले उचलणार आहोत? या घटनेमुळे नैतिकता, सुरक्षितता आणि विश्वास यांचेही रक्षण करणे अत्यावश्यक आहे. शिक्षण देणे हा केवळ व्यवसाय नाही तर संस्काराची गंगा या क्षेत्रातूनच उगम पावते. आज अनेक ठिकाणची शिक्षण पद्धती कशी आहे? पालिका, महापालिकांच्या शाळांची तसेच जिल्हा परिषदेच्या अनेक ठिकाणच्या शाळांची अवस्था काय आहे. शिकविणारे किती शिक्षण त्या गावात रहातात ? ते शहराकडून गावच्या शाळेत जातात त्यात किती वेळ निघून गेला असतो… मग प्रश्न येतो खासगी शाळांचा त्यांची भरमसाठी फी गोरगरीब जनतेला परवडतो काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दुर्दैवाने नकारात्मक मिळतात. गुणवत्ता असली तरी गरीबांची मुले फार पुढे जाऊ शकत नाहीत. आज वेळ ही केवळ चांगल्या शिक्षकांना वाचविण्याचीच नाही तर चांगले शिक्षण ग्रामीण पातळीपर्यंत कसे मिळेल याचीही आहे. असे झाले नाही तर या पवित्र क्षेत्रावरचा विश्वासच डळमळीत होईल.. समाज म्हणून आपण कोणत्या बाजुला उभे राहणार… संवेदनशिलतेच्या की क्रूरतेच्या याचा निर्णय मात्र आपणा सर्वांनाच घ्यावा लागणार आहे…. आणि विचार करा त्या बालिकेच्या कुटुंबात काय स्थिती असेल.









