---Advertisement---
पाचोरा (प्रतिनिधी) : नाशिकच्या सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या राजेंद्र औसरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक अत्यंत अनोखी आणि प्रेरणादायी कलाकृती साकारली आहे. त्यांनी लाकडी पेनावर महामानवांची सूक्ष्म, रंगीत प्रतिकृती उभी करत त्यांच्या विचारांना आणि कार्याला अभिवादन केले आहे. ही केवळ कलाकृती नसून, समाजाला जागृत करणारा एक प्रभावी संदेश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यभर शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आजही प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे. शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी पेन हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. पेन नसते, तर विचारांची अभिव्यक्ती शक्य झाली नसती, ज्ञानाची उजळणी झाली नसती आणि साक्षरतेचा प्रवास अपूर्ण राहिला असता. त्यामुळे पेन हे केवळ लेखनाचे साधन नसून, परिवर्तनाचे, प्रगतीचे आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.
याच विचारांना केंद्रस्थानी ठेवून सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांनी पेनावरच डॉ. आंबेडकरांची प्रतिमा साकारून एक प्रकारे त्यांच्या विचारांची सजीव मांडणी केली आहे. ही कलाकृती सांगते की, ज्यांनी पेनाच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली, त्यांनाच पेनावर साकारून त्यांना वंदन करणे ही अत्यंत अर्थपूर्ण गोष्ट आहे.
त्यांच्या या कृतीतून डॉ. आंबेडकरांविषयी असलेली श्रद्धा, प्रेम आणि कृतज्ञता स्पष्टपणे जाणवते. सूक्ष्म कलेच्या माध्यमातून त्यांनी समाजाला एक संदेश दिला आहे की, शिक्षण हेच खरे सामर्थ्य आहे आणि पेन हे त्या सामर्थ्याचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे.
आजच्या काळातही ही कलाकृती प्रत्येकाला विचार करायला भाग पाडते, आपण शिक्षणाचा किती योग्य वापर करतो? आपण समाजासाठी काय योगदान देतो? ऐश्वर्या यांच्या या प्रयत्नातून समाजप्रबोधनाचा दीप पुन्हा एकदा प्रज्वलित झाला आहे.
ही कलाकृती म्हणजे केवळ अभिवादन नाही, तर संपूर्ण जगासाठी एक प्रेरणादायी संदेश आहे. पेन उचला, शिक्षण घ्या आणि समाज परिवर्तनात आपला वाटा उचला!









