---Advertisement---
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर उत्साहाचे वातावरण असताना, राज ठाकरे यांनी साजरा करण्याच्या पद्धतीवर थेट भाष्य करत वेगळाच मुद्दा उपस्थित केला आहे. डीजे लावून मिरवणुका काढण्यापेक्षा विचारांचा स्वीकार करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. “भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव पुढील अनेक पिढ्यांवर राहणार आहे,” असे त्यांनी नमूद केले.
याचबरोबर त्यांनी आज साजऱ्या होणाऱ्या जयंतींच्या स्वरूपावर टीका करत सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महान नेत्यांचा वारसा केवळ मिरवणुका किंवा डीजेपुरता मर्यादित ठेवणे योग्य नाही. त्यांच्या विचारांचा अंगीकार करणेच खरी श्रद्धांजली ठरेल.
तसेच, बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांचा उल्लेख करत त्यांनी ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ या ग्रंथाची आठवण करून दिली. भारतीय अर्थव्यवस्थेवरील त्यांचा सखोल अभ्यास आणि रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत असलेले योगदानही त्यांनी अधोरेखित केले.
आजच्या राजकारणावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, विकासाची संकल्पना केवळ पायाभूत सुविधांपुरती मर्यादित राहू नये. समाजातील सर्व घटकांपर्यंत विकास पोहोचणे आवश्यक आहे. बाबासाहेबांचे व्यापक सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोन समजून घेतल्यासच समाजाचा खरा विकास होऊ शकतो.
शेवटी, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, जयंती साजरी करताना केवळ उत्सव न करता त्यांच्या विचारांचे पालन करावे.









