---Advertisement---
राहता येथील बहुचर्चित ‘भोंदूबाबा’ अशोक खरात प्रकरणात नवे वळण आले असून, त्यांच्या पत्नी कल्पना खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. या सुनावणीत बचाव आणि सरकारी पक्षाने एकमेकांवर तीव्र आरोप-प्रत्यारोप करत आपापली बाजू मांडली.
कल्पना खरात या ३१ मार्चपासून फरार असून, त्यांच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला की, त्यांचा कोणत्याही आर्थिक किंवा जमीन व्यवहारांशी थेट संबंध नाही. त्यांच्या नावावर असलेली बँक खाती प्रत्यक्षात अशोक खरात हेच हाताळत होते. त्यामुळे पतीच्या कथित गैरकृत्यांची माहिती त्यांना नव्हती, असा युक्तिवाद करण्यात आला. तसेच, फिर्यादीने दीड वर्ष उशिराने तक्रार दाखल केल्याचा मुद्दाही बचाव पक्षाने उपस्थित केला.
सरकारी वकिलांनी बचाव पक्षाचे दावे फेटाळून लावत गंभीर आरोप मांडले. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, कल्पना खरात यांच्या बँक खात्यातून सुमारे ७ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. कोणतीही स्थिर नोकरी किंवा व्यवसाय नसताना एवढे मोठे व्यवहार कसे झाले, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
याशिवाय, जमीन खरेदी-विक्रीच्या कागदपत्रांवर तसेच मुखत्यारपत्रावर कल्पना खरात यांची स्वाक्षरी आणि अंगठ्याचे ठसे असल्याचे पुरावे सादर करण्यात आले. खरात कुटुंबाच्या मालमत्तेत त्यांचा सुमारे ४० टक्के हिस्सा असल्याने, या व्यवहारांची माहिती नसणे शक्य नाही, असेही सरकारी पक्षाने नमूद केले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून, कल्पना खरात यांच्या अटकपूर्व जामिनावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे खरात कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







