---Advertisement---
जळगाव : गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या उत्खनन करून वाळू ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून चालक वाहन घेऊन शहरात येत होता. या ट्रॅक्टरला थांबवून कारवाई करीत असताना चालकासह तीन ते चार जणांनी पोलिसाला ट्रॅक्टरखाली रोडावर ढकलून सदर ट्रॅक्टर पळवून नेल्याची खळबळजनक घटना गुरुवार, 20 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खोटेनगर परिसरात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध वाळू वाहतूक विरूध्द तालुका पोलिसांनी कारवाई करण्याचा धडाका सुरू ठेवला असल्याने वाळू व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. गुरूवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास खोटेनगर परिसरातील समर्थ कॉलनी ते खोटेनगर स्टॉपकडे येणार्या रोडवर पो.ना. प्रशांत पाटील यांनी एक ब्रास भरलेल्या ट्रॉली ट्रॅक्टरची तपासणी केली. या वाळू वाहतूकीचा चालकाजवळ परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पो.ना.पाटील हे कारवाईत ट्रॅक्टर ट्रॉली तालुका पोलीस ठाण्यात आणत होते. दरम्यान या ट्रॅक्टरवरील चालक देवानंद मालक अर्जुन पाटील, मोहसिनखान तसेच तीन ते चार अनोळखी इसमांनी या शासकीय कामात अडथळा आणत पोना पाटील यांना अरेरावी केली. सदर ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात घेऊन जावू नये म्हणून पो.ना. पाटील यांना ट्रॅक्टरखाली रस्त्यावर या संशयितांनी ढकलून देत शिवीगाळ केली. त्यानंतर एक ब्रास भरलेली वाळूचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह पळवून नेले.
घटना कळताच परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी धाव घेत प्रकार जाणून घेतला. याप्रकरणी भादवी कलम 353,379,143,147,504 सह गौण खनिज विकास व विकास विनीमय अधि. क.21 व जमिन महसूल अधि.क 48(7),(8) प्रमाणे संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोउनि नयन पाटील करीत आहेत
गिरणानदीमध्ये उपसा करून वाळूची चोरटी वाहतूक करणार्या वाळूच्या तीन वाहनांना पोलिसांनी जप्त करून गुरूवार 20 रोजी धडक कारवाई केली. आव्हाणे,बांभोरी, टाकरखेडा,सावखेडा, वैजनाथ यागावांसह गिरणाकाठाच्या अन्य गावालगत मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याअनुषंगाने जळगाव तालुका पोलिसांनी जोरदार मोहिम हाती घेतली आहे. सावखेडा शिवारात गिरणानदी पात्रातून विना क्रमाकांचे ट्रॅक्टर ट्रॉलीमधून एक ब्रास वाळू भरून कोणताही परवाना नसताना चालक वाहतूक करत होता. पोलिसांनी सावखेडा गावात जाणार्या रोडवर हनुमानमंदिराजवळ सदर ट्रॅक्टरविरूध्द कारवाई करीत वाहन व वाळू असा सुमारे 2 लाख 3 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पो.ना. प्रकाश चिचोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाहन चालक मालकविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ विश्वनाथ गायकवाड करीत आहेत.
गिरणा नदीतून वाळू भरून तिची वाहतून करत असलेल्या चालकास सावखेडा शिवारात जिल्हा परिषद शाळेसमोर पिंप्राळाकडे जाणार्या रस्त्यावर रोखले असता त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीत एक ब्रास वाळू भरल्याचे दिसले. तथापि त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याची माहिती मिळाली. वाळूची चोरटी वाहतूकप्रकरणी पोलिसांनी वाळू व वाहन असा सुमारे 2 लाख 3 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोना उमेश ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टर मालक तसेच चालकाविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तपास पोना प्रकाश चिचोरे हे करीत आहेत. निमखेडी शिवारातील कांताई नेत्रालय समोर जुन्या हायवे रोडवरून वाळूची चोरटी वाहतूक करीत असलेल्या विनाक्रमांक ट्रॅक्टर ट्रॉली पोलिसांनी जप्त केला. पोकॉ निंबा भदाणे यांच्या तक्रारीवरून जनार्दन सुर्यवंशी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा तपास पोहेकॉ संजय भालेराव हे करीत आहेत.