---Advertisement---
इंद्रप्रस्थ कॉलनी: टेलिफोन नगरातील रस्त्यांची अवस्थाही वेगळी नाहीशहरातील साने गुरुजी नगर परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. रस्ते खड्ड्यात गेल्याने या रस्त्यांवर दुचाकीचालक पावसामुळे चिखलात घसरून पडत आहेत. त्यामुळे अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी दुचाकीने पालक याच रस्त्यांवरून विद्यार्थ्यांना शाळेत सोडतात. स्कूल बसही बहुतांश विद्यार्थ्यांना याच रस्त्यांवरून घेऊन जाते. मात्र या रस्त्यांचे नशिब उजळत नसल्याने नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
अमृतचे काम झाले,मात्र रस्त्यांचे काम होईना
सोने गुरुजी नगर परिसरातील जिल्हाधिकारी निवासस्थानच्या मागील बाजूचा हा रस्ता आहे. या रस्त्यांवरील अमृत योजनेच्या पाईप लाईनचेही काम झाले. मात्र रस्त्यांच्या कामांचा मुुहुर्त लागत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पावसाचे पाणी या रस्त्यांवर साचल्यानंतर वाहने चालवायची कशी असा प्रश्न वाहनधारकांना पडतो. गेल्या अनेक दिवसांपासून हा संपूर्ण रस्ता उखडला आहे. पावसामुळे मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यांवर चालणेदेखील अवघड झाले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने मनपा प्रशासनाने रस्त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. जेणेकरून नागरिकांची अडचण दूर होईल. डागडुजी न करता हा रस्ता क्रॉक्रिट रस्ता व्हावा.
– एस.आर.राजपूत, रहिवाशी
उन्हाळ्यातच हा रस्ता अमृतच्या कामांमुळे खोदण्यात आला. मात्र त्यावर फक्त मुरूम टाकण्यात आला. डांबरी रस्ता फोडण्यात आला. मात्र पुन्हा तसाच रस्ता करण्यात आला नाही. परिणामी खोदलेल्या रस्त्यांमुळे पावसाचे पाणी साचत गेले. त्यात वाहने जाऊन आदळतात अन् अपघात होतात. तरी आता याठिकाणी कॉक्रिट रस्ता तयार व्हायला हवा
– पी.एम.पाटील, रहिवाशी नगरसेवक नितीन बरडे यांचा ‘नो रिप्लाय’
या वार्डातील रस्त्यांच्या पाठपुराव्याबाबत नगरसेवक नितीन बरडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. नगरसेवकांनी वार्डातील समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी रहिवाशी करीत आहे. रस्त्यांच्या अडचणीकडे नगरसेवक लक्ष देणार कधी, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करीत आहेत.