---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह न्यूज जळगाव ः कापूस भरुन निघालेल्या ट्रकला समोरुन येणार्या वाहनाने कट मारला. यामुळे ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक ममुराबाद ते विदगाव रस्त्यावरील हातेड नाल्याच्या वळणावर पलटी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात राज रविंद्र अहिरे (भिल) (वय-20, रा. मुंगटी जि. धुळे) या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर वाहनातील चालकासह 7 मजूर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
धुळे जिल्ह्यातील मुंगटी येथील ट्रक (एमएच 18 एए 1080) कापूस घेण्यासाठी गुरुवारी सकाळी मजूरांना घेवून यावल तालुक्यात आला होता. डांभूर्णी येथे शेतकर्यांकडून कापूस भरल्यानंतर दुपारच्या सुमारास तो मुंगटी येथे जाण्यासाठी निघाला. दुपारी ममुराबाद ते विदगाव रस्त्यावरील शेलीनो फार्मसी कॉलेजजवळून जात असताना समोरून येणार्या अज्ञात वाहनाने कट मारला. यात चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक हा वळणावर असलेल्या हातेड नाल्याजवळ पलटी झाला. या अपघातात ट्रकमध्ये बसलेले मजूर गंभीर जखमी झाले तर राज रविंद्र अहिरे-भिल हा तरुण जागीच ठार झाला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
अपघातातील जखमी मजूर
अपघातात प्रमोद संभाजी पाटील (वय-40), भरत दगडू पाटील (वय-32), दिगंबर दिलीप पाटील (वय-30), रवींद्र बारकू भिल अहिरे (वय-50), जितेंद्र पवार (वय-35), निंबा दगडू पाटील (वय-36) आणि बुधा पाटील (वय-60) सर्व रा. मुंगटी ता. जि.धुळे हे गंभीर जखमी झाले आहे.