जळगाव : प्रशासक म्हणून महापालिकेचा कारभार पाहत असताना लोकाभिमुख विविध योजना पूर्ण करण्यासह रस्त्यांची कामे व अमृतसह ड्रेजेन योजना कार्यान्वित करण्याकडे लक्ष्ा देणार आहे. यासोबतच गेल व भारत पेट्रोलियम यांच्या माध्यमातून घनकचऱ्यापासून सीएनजी गॅस प्रकल्प येत्या दोन महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जळगाव महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिली.
‘तरुण भारत’ कार्यालयात स्थापन केलेल्या गणेशाची आरती डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याशी ‘तरुण भारत लाईव्ह’तर्फे संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.
गेल्या वर्षभरापासून जळगाव शहर महापालिकेची आयुक्त म्हणून काम पाहत आहे. त्यामुळे बऱ्याच समस्यांची जाण आहे. त्या अनुषंगाने नियोजनदेखील सुरू केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमृतची कामे सुरू असतांना रस्त्याची कामे करण्यास परवानगी नव्हती. आता जसजसे अमृतची कामे पूर्ण होत आहे तसतशी रस्त्यांची कामे सुरू होत आहेत. अमृत योजनेतून पाणी पुरवठा योजना व ड्रेनेज योजना ही दोन्ही कामे 90 टक्के पूर्ण झालेली आहेत.
140 कोटींची रस्त्याची कामे सुरू
आता रस्त्याची कामे सुरू करत आहेत. मी आयुक्त म्हणून रूजू झाल्यापासून 70 ते 80 कोटींची कामे महानगरपालिकेच्या माध्यमातून केली आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना मुलभूत सोई सुविधा पुरविणे आणि डीपीसीडीतून विविध योजनाच्या माध्यमातूनही रस्त्याची कामे सुरू आहेत. पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून 2018-19 मध्ये मान्य झालेल्या 100 कोटीतील 14 कोटींतील रस्त्याची कामे सुरू केलेली आहेत. पीडब्ल्यूडीमार्फत 50 ते 60 कोटींची रस्त्यांची कामे व विविध कामे करण्यात येत आहे.
नाशिकसह राज्य शासनाकडे कामे मंजुरीसाठी प्रलंबित
अमृत ड्रेनेज किवा पाणीपुरवठा झालेला नाही त्याच ठिकाणी सीसी रोडचा प्रश्न आहे. तेवढे सोडून उर्वरित ठिकाणी रस्त्याची कामे सुरू केलेली आहेत. फरक असा आहे की पीडब्ल्यूडीला मुख्य रस्त्यांची कामे दिलेली आहे. त्यामुळे ती पटकन दिसत नाहीत. कारण ती विविध स्तरांवर प्रलंबित आहेत. काही कामे राज्य शासनाच्या मंजुरीसाठी तर काही कामे नाशिकच्या विभागीय कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. असे असले तरी महानगरपालिकेच्या फंडामधून कामे सुरू आहेत. परंतु ही कामे लहान स्वरुपाची असल्याचे ती दिसून येत नाहीत. कारण ही कामे विविध गल्ल्यांमध्ये आहेत. मी जेव्हा आयुक्त पदाचा पदभार घेतला तेव्हाची स्थिती आणि आताची स्थिती यात बराचसा बदल झालेला आहे.
गणेश विसर्जनासाठी नियोजन
गणेश विसर्जनासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची दुरूस्ती करण्यात येत आहे. जेथे झाडाच्या फांद्या अडचणीच्या ठरत असतील त्या तोडण्यात येत आहे. तर लोंबकळणाऱ्या वीज ताराही वर घेण्याबाबत महावितरण कंपनीला सांगण्यात आले आहे. आजच माझ्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्ष्ाक एम राजकुमार, गणेश महामंडळाचे अध्यक्ष्ा सचिन नारळे यांनी विसर्जन मार्गाची पाहणी केली. पीडब्ल्यूडीला त्यांच्याकडे असलेल्या रस्त्यातील खड्डे बुजविण्यास सांगण्यात आले आहे, तर जे रस्ते मनपाकडे आहेत त्यातील खड्डे बुजविण्यात येत आहे.
गुलाल न उधळण्याचा आदर्श
जळगाव शहरात गणेश विर्सजन मिरवणुकीत गुलाल न उधळता फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्याचा एक चांगला आदर्श जळगावकरांनी उभा केला आहे. सार्वजनिक गणेश महामंडळाने सर्व गणेश मंडळांना सोबत घेत उत्तम असे नियोजन केले आहे. मागील वर्षीही शांततेत मिरवणुका पार पाडल्या. यावर्षीही त्या होतील अशी खात्री आहे.
पीएम ई बस सेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या नेतृत्वाखाली ई बस सेवेचा उपक्रम राबवत आहे. त्यात जळगावला 50 ई बस केंद्र सरकारकडून मिळणार आहेत. त्यासाठी पुरेशा अशा जागेचा व महावितरण कंपनीकडून चार्जिंग स्टेशनसाठी वीजपुरवठ्याबाबतचा ना हरकत दाखला राज्य शासनाला पाठवायचा आहे. राज्य शासन केंद्र सरकारला पाठवेल. त्यानंतर या बसेस येतील. बसेस आल्यानंतर एजन्सीची निवडीसाठी निविदा काढून ही सेवा सुरू होईल. चार्जिंगचा येणार खर्च हा प्रवासी तिकिटातून खर्च करता येईल. शहरासह शेजारच्या गावातूनही ही सेवा देण्याबाबत प्रयत्न राहणार असल्याचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी सांगितले.