---Advertisement---
जळगाव : बालपणापासून जोपासलेली दोस्ती दोघांनी शालेय जीवनापासून तारुण्यांतही जोपासली. दोघेही नेहमी सोबतच वावरत असायचे. अगदी दोघेही एकाच ठिकाणी काम करत होते. गुरुवारी दोघे सोबत दुचाकीने बाहेर गावी गेले. परत येत असताना दुचाकीचा अपघात झाला. या दुर्घटनेत नीलेश गोकुळ पाटील (32) रा.श्रीराम मंदिर चौक मेहरुण या एका मित्राचा मृत्यू झाला.
तर दुसरा मित्र महेश रवींद्र खुरपुडे (30) रा.लक्ष्मीनगर मेहरुण हा जखमी झाल्याची घटना गुरुवार 28 रोजी रामदेववाडी तांडाजवळ घडली. या दोघांच्या मैत्रीवर काळाने असा घाला नको घालायला होता,अशी भावना मेहरुणमधील तरुणांनी शुक्रवारी रुग्णालयात व्यक्त केल्या. महेश खुरपुडे तसेच निलेश पाटील हे दोघे मित्र गुरुवारी पल्सर दुचाकीने मेहरुण येथून सोबत बाहेर गावी गेले. त्यानंतर दुपारुन ते परत येत असताना दुचाकीला अपघात झाला. यात निलेश याच्या डोक्याला गंभीर इजा होवून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटना कळताच मेहरुण येथील उमेश सोनवणेसह काही तरुंणानी धाव घेतली.
दोघा मित्रांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती निलेश याना मृत घोषीत केले. तर जखमी महेश याच्या हातापायाला गंभीर इजा झाली असून उपचार सुरु आहेत. मेहरुण येथील प्रशांस नाईक यांच्यासह असंख्य तरुणांनी आज रुग्णालयात धाव घेतली. निलेश याचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना जबर धक्का बसला. निलेश याच्या पश्चात वडिल गोकुळ पाटील,लहान भाऊ राहुल तसेच विवाहित बहिण मनिषा देशमुख असा परिवार आहे.