---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 2 लाख 25 हजार मे.टन खतांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 लाख 96 हजार मे.टन आवटंन रब्बीसाठी मंजूर झाले असून आजस्थितीत जिल्ह्यात 1 लाख 6 हजार 915 मे.टन खतसाठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुरज जगताप यांनी दिली.
जिल्ह्यात सध्यास्थितीत युरिया 26 हजार 251 टन उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी 69 हजार 450 टन युरियाचे आवंटन प्राप्त होणार आहे. जिल्ह्यासाठी 80 हजार टन युरियाची मागणी करण्यात आली होती. तसेच रब्बीसाठी 13 हजार मे.टन डीएपी खाताची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 9 हजार 120 चे आवंटन प्राप्त होणार आहे. डीएपीचा जिल्ह्यात 5 हजार 189 मे.टन खतसाठा शिल्लक आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात एमओपी 10 हजार 510 मे.टन, एसएसपी 22 हजार 447, एनपीके 42 हजार 518 मे.टन खतसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकाची काढणी सुरू झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात साधारणत: शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागतात. त्यासाठी शेतकऱ्यांकडून कामाला वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका, ज्वारी, बाजरी आदींची पेरणी केली जाते. त्यामुळे जिल्ह्यात खरीपानंतर शेतकरी रब्बीच्या तयारीला लागला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेतीची मशागत सुरू केली आहे. थंडीचे आगमन झाल्यानंतर पेरणी क्षेत्रातही मोठी वाढ होणार आहे.