धुळे : धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील असंख्य ठेवीदारांचे पैसे मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीने पैसे बुडविले आहेत. मैत्रेय कंपनीने लाखो लोकांचं फसवणूक केली आहे. ठेवीदारांचे परताव्याची रक्कम वितरित करण्यासाठी शासनाने समिती गठित केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश समितीला द्यावेत अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी विधानसभेत केली.
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. अधिवेशनात बुधवारी धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यासह राज्यातील मैत्रेय ठेवीदारांच्या झालेल्या फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलताना आ. कुणाल पाटील यांनी सांगितले की, मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीने राज्यातील सुमारे २ कोटी १६ लक्ष नागरिकांचे एकूण २६०० कोटी रुपये बुडविले आहेत. ही कंपनी सन २००९ पासून मैत्रेय गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत आहे. तसेच या कंपनीची कार्यालयेही बंद झाली आहेत. समितीला राज्य सरकारने ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी केली.