धुळे: शिस्तीचे खाते म्हणून पोलीस दलाकडे आदराने पाहिले जाते, मात्र या शिस्तीच्या खात्यातील पोलिसांनी शिस्त मोडत बंदोबस्त सोडून परस्पर दांडी मारल्याने सात पोलीस कर्मचाऱ्यांना धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तडकाफडकी निलंबित केल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.बंदोबस्तात गैरहजेरी भोवली 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना नाकाबंदी तसेच बिनतारी संदेशावर नियुक्ती दिली होती, मात्र सात पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करीत दांडी मारल्याचा प्रकार समोर आला.
दंगा काबू पथकातील (आरसीपी) कर्मचारी अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तात गैरहजर आढळले तर वरिष्ठांनी बिनतारी संदेश दिल्यानंतर काही कर्मचारी गैरहजर आढळल्याने अशांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने सेवेतून निलंबित केले. पोलीस दलाकडे शिस्तीचे खाते म्हणून पाहिले जाते, मात्र कर्तव्याबाबत गैरहजेरी खपवून घेणार नाही. आगामी काळात निवडणुका तसेच अन्य ठिकाणी लावलेल्या बंदोबस्तातही कर्मचाऱ्यांची हजेरी तपासण्यात येईल. तसेच सरप्राईज व्हिजीट करूनही कर्मचाऱ्यांची हजेरी तपासली जाईल. त्यात हयगय करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल, असेही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले.