---Advertisement---
जालना : दहा फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे, मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही जरांगे पाटील सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करत आहेत. यावर शासनाकडून दखल घेतली जात नाही म्हणून मनोज जरांगे यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांच्या या विधानानंतर मराठा समाजाकडून जिल्ह्या जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते.
मनोज जरांगे यांच्या आदेशानंतर मराठा आरक्षणाच्या मागणसाठी काल मराठा बांधवांकडून जिल्ह्याजिल्ह्यात रास्तारोको करण्यात आला होता. या रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीचे उल्लंघन आणि हुल्लडबाजी केल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे
काही भागात आंदोलक आणि पोलिसांत धक्काबुक्की झाल्याचेही प्रकार बघायला मिळाले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये भोकरदनमध्ये 70, हसनाबाद 15, बदनापूरमध्ये 100 पेक्षा अधिक, परतूरमध्ये 9 तर अंबडमध्येही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.