---Advertisement---
मागील काही वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ते माफीवीर होते, मा क्रांतिवीर नाही अशा पद्धतीचे कथानक म्हणजे विमर्श म्हणजे नॅरेटिव्ह बनविण्याचा प्रयत्न काँग्रेस, हिंदुत्वविरोधी, कम्युनिस्ट करीत आहेत. सावरकरांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी सर्वप्रथम आपली देशभक्ती तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. काही वर्षांपूर्वी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर व राहुल गांधींनी सुद्धा माफीवीर म्हटले होते. त्यांची री ओढणारे अनेक गल्लीबोळातील नेते सुद्धा त्यांना माफीवीर म्हणू लागले. हिटलरचा प्रसिद्धिप्रमुख गोबेल पाने म्हटल्याप्रमाणे खोटे सुद्धा जर तुम्ही वारंवार सांगत राहिला तर काही दिवसांनी लोकांना ते खरे वाटू लागते. कारण काळ बदलत असतो. पिढी बदलत असते. सर्वांनाच इतिहासाचे ज्ञान राहील असे सांगता येत नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतिवीरांनी आपले बलिदान केले, कारावास भोगला, त्याग केला, हालअपेष्टा भोगल्या त्यांच्या कष्टांची किंमत आजच्या लोकांना तेवढीशी नाही. त्यातल्या त्यात सावरकर म्हणजे क्रांतिवीरांचे मेरुमणी, सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे हिंदुत्व, सावरकर म्हणजे क्रांतिवीरांचे प्रेरणास्थान. त्यामुळे सावरकरांना अपमानित केले म्हणजे संघ परिवार, मोदी सरकार आणि हिंदुत्व मानणाऱ्या करोडो लोकांना अपमानित केल्याचे पुण्य अशा लोकांना मिळते. त्यामुळेच ते अशा पद्धतीचे दुःसाहस वारंवार करीत असतात. यातून सर्वसामान्य माणसाला सुद्धा असे एखाद्या वेळेस वाटू शकते की खरोखरच सावरकरांनी माफीपत्र लिहिले होते का?
याचे उत्तर आहे सावरकरांनी कधीही माफीपत्र लिहिले नाही. माफीची याचना केली नाही. माफी म्हणजे मी जे केले आहे त्याचे मला दुःख आहे व मी पुन्हा तसे करणार नाही. सावरकरांनी लिहिलेले विविध पत्र, ज्यामध्ये त्यांनी इंग्रज सरकारला त्यांच्या कैदेतून सूट देण्याची विनंती केलेली आहे ते सर्वच पत्र मुळातून वाचण्यासारखे आहे. फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ सावरकर ज्या मोरिया नावाच्या जहाजातून प्रवास करीत होते तेथून त्यांनी समुद्रामध्ये उडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आले की तुम्ही असा पळून जाण्याचा प्रयत्न का केला त्यावेळेस दिलेल्या उत्तरात ते म्हणतात की, बंदिवासात असलेल्या प्रत्येक जीवाचे प्रथम कर्तव्य स्वतःची मुक्तता करणे आहे. त्यामुळे मी ते करण्याचा प्रयत्न केला. सावरकरांनी ज्यावेळेला पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस जहाजावर असणाऱ्या इंग्रजांच्या सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार सुद्धा केला. यातील काही गोळ्या त्यांना लागून सावरकर तेथेच वीर गतीला प्राप्त होऊ शकले असते. म्हणजे त्यांनी जे केले त्यामध्ये जीवावरचे साहस होते. असे जीवावरचे साहस क्रांतिवीरच करू शकतात, माफीवीर नाही हे विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे. सावरकरांवर हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केला गेलेला होता. परंतु इंग्रजांनी त्या खटल्याची कारवाई पूर्ण होण्याच्या अगोदरच सावरकरांना पन्नास वर्षांची शिक्षा ठोठावली. इंग्रज सरकारचे सावरकरांवर प्रेम असते तर त्यांनी एवढी कठोर शिक्षा ठोठावलीच नसती.
छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेमध्ये असताना त्यांनी सुद्धा औरंगजेबाला अनेक पत्रे पाठविली. त्यामध्ये स्वतःच्या सुटकेसाठी बादशहाला विनंती केलेली होती. जर त्यांनी स्वतःच्या सुटकेसाठी बादशहाला केलेल्या विनंतीला जर कोणी माफीनामा म्हणू लागले तर त्याला मूर्खातच काढले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे कृष्णनीतीला मानणारे होते व सावरकर हे कृष्णनीती व शिवाजीनीती या दोन्हीला मानणारे होते. काही क्रांतिकारकांना फासावर चढण्यात धन्यता वाटत होती, काहींना पळून जाऊन भूमिगत राहून क्रांतिकार्य करण्यात देशसेवा वाटत होती. प्रत्येक क्रांतिकारकाचे विचार वेगवेगळे होते. परंतु त्यांच्या देशभक्तीचा स्तर मात्र एकसारखा आणि उच्च होता. सावरकरांना भारत मातेच्या मुकुटावर स्वातंत्र्याचा कुमकुम तिलक लागलेला पाहण्यामध्ये आनंद होता व त्यासाठी शेवटपर्यंत काम करण्याची त्यांची इच्छा होती. आपण अंदमानात राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी काहीही करत नाही अशी खंत सावरकरांनाही वाटत होती व अंदमानातील अनेक क्रांतिकारकांना सुद्धा वाटत होती. परंतु सावरकर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या क्रांतिकारकांना समजवायचे की आपले या अंदमानाच्या जेलमध्ये राहणे सुद्धा ही देशसेवाच आहे. भारत स्वतंत्र होतपर्यंत जर आपण जिवंत सुटलो तर भारताचे स्वातंत्र्य आपल्याला पाहायला मिळेल आणि जर त्या आधीच आपला या तुरुंगामध्ये अंत झाला तर भारताच्या स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारतातील आपले बंधू या अंदमानात येतील व आपण सर्वांनी केलेल्या देशसेवेचे स्मरण करून याच सेल्युलर जेलमध्ये आपले पुतळे उभारतील, अशा पद्धतीचे विचार माफीवीरांचे असतात की क्रांतिवीरांचे? उत्तर आहे क्रांतिवीरांचे
काँग्रेस किंवा इतर विरोधकांच्या जवळ सावरकरांच्या तोडीचा एकही क्रांतिवीर नाही आणि त्यांची विचारधारा आत्मसात करणारा सुद्धा क्रांतिवीर नाही. त्यामुळे सावरकरांना बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे. अंदमानच्या यातनांनी त्रस्त होऊन सावरकरांनी आपल्या शिक्षेमध्ये सूट मिळावी हा इंग्रज सरकारला अर्ज केलेला नव्हता तर ज्यावेळेस त्यांना पन्नास वर्षांची शिक्षा झाली त्यावेळेसच डोंगरीच्या कारागृहातून त्यांनी पहिला अर्ज केला होता. म्हणजे १९१० ते १९२० या दहा वर्षात त्यांनी अनेक अर्ज इंग्रज सरकारला पाठवले होते. अशा पद्धतीचे अर्ज देणे ही त्या काळजी पद्धत होती व अनेक क्रांतिकारकांनी अशा पद्धतीचे अर्ज दिले होते व त्यांना शिक्षेतून सूट सुद्धा मिळालेली होती. सावरकर हे सशस्त्र क्रांतीचे प्रणेता होते. त्यामुळे इंग्रज सरकार त्यांच्यावर कुठल्याही परिस्थितीत विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांना भारतात आणल्यावर सुद्धा विविध कारागृहांत तीन वर्ष ठेवण्यात आले व त्यानंतर स्त्नागिरी येथे तेरा वर्षे स्थानबद्ध करण्यात आले.
सावरकर क्रांतिवीर होते. भारताच्या स्वातंत्र्याकरिता प्रयत करणाऱ्या हजारो तरुणांचे प्रेरणा केंद्र होते. म्हणूनच इंग्रजांनी त्यांना इतके वर्ष बंदिवासात ठेवले. सावरकरांना माफीवीर म्हणणे म्हणजे क्रांतिकारकांचाच नव्हे तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तमाम क्रांतिवीरांचा अपमान आहे. देशभक्त जनतेने हे कदापि सहन करायला नको आणि या अशा लोकांना ठासून सांगायला पाहिजे की होय, सावरकर हे क्रांतिवीरच होते. आज २६ फेब्रुवारी ही तारखेनुसार त्यांची पुण्यतिथी आहे. असे करणे हीच त्यांना दिलेली आदरांजली ठरेल.
अमोल पुसदकर
९५५२५३५८१३
(लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)