---Advertisement---
जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ हा समर्थानी शोधायला सांगितलं. त्याचं उत्तर मी शोधलं. तुम्हीही सहमत व्हाल हा विश्वास… ‘ज्याच्या घरात पाणी, खिशात पैसा आणि ज्याला हक्काचा जोडीदार आहे तो खरा सुखी.’ हे मी गमतीने बोलत नाही. हे त्रिकालाबाधित सत्प आहे. एकदा जरा डोळे लावून शांत विचार करा; माझे म्हणणे आपणास पूर्णतः पटेल. तुमच्या घरी विहीर, कूपनलिका, नळ असे पाण्याचे स्रोत असतात. असलेला पाण्याचा स्रोत आटू द्या. मग पाहा आपण किती अस्वस्थ होतो. नळ जर काही दिवस उशिरा यायला लागले तर किती चिडचिड होते. घरातल्या साठवणीच्या टाक्या जर ठणठण असतील तर जीव कासावीस होतो की नाही पाहा.
आज नळ येणार म्हटलं की सर्व कार्यक्रम रद्द. काही जण तर आपल्या ड्युटीवरून सुटी काढून येतात पाणी भरायला. पाणी घरात नसेल तर सुख हरविल्यासारखे अस्वस्थ वाटते. पाण्याविना जर एवढी जिवाची काहिली होत असेल तर पाण्याचे महत्त्व तर आपल्याला समजलेच पाहिजे. मग त्याचा वापरही पुढील धोका लक्षात घेऊन जपून जपून केलाच पाहिजे. ज्याच्यामुळे संसार अस्वस्थ होतो त्याचे महत्त्व म्हणजे ‘पाणी का मोल पहचानिएं’ असं उगाच म्हटलं नाही. ‘पुढील पुद्ध पाण्याचे’ असे अनेक जलतज्ज्ञ सांगतातच. पाण्याप्रमाणेच अस्वस्थता खिशात पैसे नसतील तर होते. पैसा देव नाही, पण देवापेक्षा कमी नाही, असं उगाच म्हणत नाहीत. तुम्ही घराच्या बाहेर पडा, समजा तुमचं पाकीट जर घरी विसरले. पैशाचे काहीच काम नसले तरीहीअस्वस्थ वाटायला लागते. लवकर घराचा रस्ता धरावा वाटतो.
जे लोक नोकरीला आहेत त्यांचा महिन्याचा शेवटचा आठवडा पाची अनुभूती घेतो. पैसा नुसता कपाटात असला तरीही माणूस आनंदी राहतो. म्हणून पैसाही लागत लागत खर्च केला पाहिजे. याचा अर्थ ‘मरावे परी किती रुपये उरावे?’ असा नसून योग्य ठिकाणी योग्य वापर आहे. उगाच उधळपट्टी नको आणि कंजूषीही नको. कारण पैशाशिवाय जीव अशांत होतो.जीवनात जसं पैसा आणि पाण्याचं आहे तसंच हक्काचा जोडीदार म्हणजे नव-याला बायको आणि बायकोला नवरा आहे, हक्काचा म्हणजे मन जुळणारा ‘मनाचीये गुंती’ जोडीदार. नाहीतर पती-पत्नीत रोज भांडण-तंटा, कटकटअसेल; जे एकमेकांना नकोसे झालेले जबरदस्तीचे, विजोड गुणी असतील तर त्यांचे जीवन वनवास आहे. पण जर जोडीदार हक्काचे असतील तर त्यांचे जीवन नंदनवन असेल. जरा कुठे बायको माहेरी जाऊ द्या. विरह सहनच होत नाही. नवरा कामासाठी बाहेर जातो, पण जरा सहाचे सात झाले तर जिवाची घालमेल, हक्काचा जोडीदार घरात असल्यावर भलेही ते एकमेकांशी बोलणार नाहीत.
मोबाईलमध्ये गुंग राहतील, पण घरीच हवेत. जोडीदार जेव्हा जिवीच्या जिव्हाळ्याचा असतो तेव्हा खटकेदेखील लटिके असतात. त्यांच्यात भांड्याला भांडे लागतेच, पण तरीही जोडीदार सर्व सुखाचे आगर असते. पत्नी नावाचे ऊर्जा केंद्र आपल्या जीवनात सुखसागर आहे. पाणी, पैसा आणि जोडीदार यातला एक जरी घटक नसेल तर दुःख पर्वताएवढे अशीच अनुभूती येते. एखाद्याकडे भरपूर पाणी आणि पैसा आहे, पण जोडीदार भांडकुदळ, कर्कशा असेल तर सुख पळूनच जाते. बरं, पाणी आहे आणि जोडीदार आहे. पण पैसा नाही. तरीही अस्वस्थता आहेच. पैसा जोडीदार आहे, पण पाणी नसेल तर दिवस खराब जातो. पाणी, पैसा, जोडीदार यातील एकही घटक नसेल तर सारं अव्यवस्थित होतं. सद्यः स्थितीत दुर्दैवाने अनेकांना तीनही बाबी नशिबात नसतात; त्यांचे तर दैवच फुटले. काहींकडे फक्त एखादीच असते तर काहींना यातल्या दोन बाबी मिळतात. त्यामुळे अस्वस्थता निर्माण होते. थोडक्यात ज्याच्या घरात पुरेसे पाणी, पर्याप्त पैसा आणि प्रेमाचा जोडीदार असतो, त्यांच्यासारखा आनंदी तोच. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ या प्रश्नाचं उत्तर हेच आहे- ‘विचारे मना तूच शोधोनी पाहे!’
९८२२२६२७३५