---Advertisement---
मुंबई : राज्याचा वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार, दि. २९ जून रोजी विधानसभेत मांडला. यात राज्य सरकारने कौशल्य विकास व रोजगाराभिमुख शिक्षणावर मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींच्या व्यावसायिक शिक्षणातील शंभर टक्के फी भरण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्यसरकारने घेतला आहे, यासाठी अर्थसंकल्पात २ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यसरकारच्या या निर्णयाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने स्वागत केले आहे.
अर्थसंकल्पाबद्दल मत व्यक्त करताना अभाविप कोकण प्रदेशमंत्री संकल्प फळदेसाई म्हणाले की, कौशल्य विकास, संशोधन, वैद्यकीय शिक्षणामध्ये निधीची केलेली भरीव वाढ अभिनंदनीय आहे. विशेषतः व्यावसायिक शिक्षणामध्ये ८ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थीनीची शंभर टक्के फी भरण्याचा राज्य सरकारचा निर्णय प्रशंसनीय आहे. या योजनेचा राज्यातील सुमारे २ लाख विद्यार्थीनींना फायदा होणार आहे. यामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक शिक्षण घेऊ शकतील. या सर्व योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी राज्य सरकारने योग्य ती पाऊले उचलावी तरच या योजना विद्यार्थ्यांना लाभकारी ठरतील. शिक्षण क्षेत्रातील भरीव तरतुद राज्यातील शिक्षण क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी आहे.