---Advertisement---
वॉशिंग्टन डी. सी : वाढत्या वयामुळे आणि खराब स्वास्थामुळे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन आगामी अध्यक्षीय निवडणूक लढवणार का नाही? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. यावेळी डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीच्या शर्यतीत पुढे असल्याने बायडन यांचा संभावित पराभव लक्षात घेता उमेदवार बदलण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षात हालचाली सुरू असल्याची माहिती अनेक माध्यमांनी दिली आहे.
दरम्यान, बायडन यांनी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याबाबत मोठे वक्तव्य केल्याने नव्याने उमेदवार बदलण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. एनएएसीपीच्या वार्षिक अधिवेशनाला संबोधित करताना बायडन म्हणाले की, उपाध्यक्ष कमला हॅरिस या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. त्यांनी राजीनामा दिल्यास कमला हॅरिस त्यांची जागा घेण्यासाठी उत्तम उमेदवार असतील, असे त्यांनी सांगितले.
निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे वृत्त फेटाळून लावत ते म्हणाले की, जर माझी प्रकृती ठीक नसेल आणि डॉक्टरांनी मला आरोग्याशी संबंधित काही समस्या असल्याचे सांगितल्यास मी निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेण्याचा विचार करेन, असेही ते म्हणाले. बायडन यांनी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिला असला तरी, त्यांच्याच पक्षातून त्यांच्यावर दबाव वाढत आहे.
डेमोक्रॅटिक पक्षातील नेते बायडन यांच्या जागी अमेरिकेच्या विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यासाठी चर्चा करत आहेत. कमला हॅरिस यांनी आपल्या संभावित उमेदवारीवर अद्याप प्रतिक्रिया दिली नसली तरी, पडद्यामागून त्या सूत्र हलवत असल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. नुकतेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केली. मात्र, दोघांमध्ये झालेल्या संभाषणाची सविस्तर माहिती समोर आलेली नाही.