मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांत समसमान जागावाटप व्हावे, यादृष्टीने शरद पवार आणि उद्धव ठाकरे प्रयत्न करीत असताना, काँग्रेसने या सूत्राला सुरुंग लावला आहे. मित्रपक्षांनी कितीही दावे केले, तरी विधानसभेला सर्वाधिक जागा लढविण्याचा निर्णय कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक दि. १९ जुलै रोजी गरवारे क्लब येथे पार पडली. आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
परिस्थितीत मित्र पक्षांपेक्षा काँग्रेसची ताकद अधिक आहे. लोकसभेत ते सिद्ध झाले आहे. फूट न पडलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष मविआत आहे. त्यामुळे मोठा भाऊ या नात्याने सर्वाधिक जागा लढवून सर्वाधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले. परिणामी, उद्धव ठाकरेच मविआचा चेहरा असतील, हा राऊतांचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे.
विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगसंदर्भात बैठकीत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले, त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असून काही दिवसांत आपल्याला त्याची माहिती मिळेल. पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार असे के. सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले.
महायुती सरकारच्या योजनांचा धसका
महायुती सरकारने अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांचा धसका काँग्रेसने घेतला आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. विशेषतः लाडकी बहीण, अन्नपूर्ण योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा आदी घोषणांचा विधानसभा निवडणुकीत महायुतीला फायदा होईल, असे प्रभारींच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून त्याला कसे काऊंटर करता येईल, यासंदर्भात चर्चा झाली. तेलंगण आणि कर्नाटकमध्ये कार्यरत असलेल्या काँग्रेसच्या ‘थिंक टँक’कडून याबाबत मार्गदर्शन घेण्याचे ठरवण्यात आले.