जळगाव : गणेश कॉलनी रोडवरील गोकुळ स्विट मार्ट चौकातील सिंग्नल हे बंद असल्याने ते तात्काळ सुरु करण्यात यावे यामागणीसाठी प्रहार जनशक्ती पार्टीतर्फे ‘सिग्नला पाहा आणि फुले वाहा’ असे अनोखे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महानगराध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, २३ रोजी करण्यात आले. यानंतर मागण्यांचे निवेदन वाहतूक निरीक्षक व मनपा आयुक्त यांना देण्यात आले.
गणेश कॉलनी रोडवरील गोकुळ स्विट मार्ट येथील परिसर हा वाहतूकीचा वर्दळीचा परिसर असून या रस्त्यावरुन नागरिक, शाळा, कॉलेज मुला- मुलींचा मोठा वापर असतो तसेच चहु बाजूंनी सुध्दा येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ असते. त्यामुळे या चौकामध्ये वाहतूक शाखेने सिंग्नल बसविलेले आहेत. परंतु, संबंधित सिंग्नल हे कित्येक दिवसांपासून बंद अवस्थेत पडलेले आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूकीस अडथळा निर्माण होत असतो व अनेक वेळा छोटे-मोठे वादविवाद होत असून रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने ट्रॅफीक जाम होत असते.
या ठिकाणचे बंद असलेले सिंग्नल तात्काळ सुरु (कार्यान्वित) करण्यात यावे व होत असलेली वाहतूकीची कोंडी थांबविण्यात यावी. तसेच याठिकाणी एक कायम स्वरुपी वाहतूक पोलीस यांची नेमणूक करावी जेणेकरुन वाहतूक सुरळीत होऊन वादविवाद थांबतील.
तसेच जळगाव महानगरपालिका आयुक्त यांनी शहरामध्ये नविन सिंग्नल पोल उभारण्याचे काम सुरु केलेले आहे. तरी याठिकाणी हा सिंग्नल हा आपल्या पाहणीनुसार बंद असल्यास त्याठिकाणी नविन सिंग्नल पोल उभारण्यात यावा. तसेच जोपर्यंत नविन सिंग्नल पोल उभारला जात नाही तोपर्यंत जुना सिंग्नल पोल तात्काळ दुरुस्त करुन चालू करण्यात यावा. अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.