---Advertisement---
मुंबई : मराठा क्रांती ठोक मोर्चाने उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर आंदोलन सुरु केलं आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मातोश्रीबाहेर दाखल झाले असून अनेक घोषणा देत आहेत.
सोमवारीदेखील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अनेक कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीबाहेर गेले होते. परंतू, उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांनी मातोश्रीकडे आपला मोर्चा वळवला आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी ते अनेक घोषणा देत असून आक्रमक झाले आहेत. याशिवाय उद्या दुपारी १२ वाजता शरद पवारांच्या घराबाहेरसुद्धा आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे. तसेच आम्ही सर्वपक्षीय नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
संपूर्ण राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना विरोधी पक्ष गप्प का? असा सवाल राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे.