---Advertisement---
मुंबई : कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही. बंद केला तर कारवाई होणार, असे आदेश हायकोर्टाने दिले आहे. महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली होती. यावरून आता उच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे.
बदलापूरमधील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याच्याराच्या निषेधार्थ २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. दरम्यान, याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर नुकतीच सुनावणी पार पडली असून न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही. तरीही कुणी बंद पुकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच उद्याचा बंद बेकायदेशीर असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसही बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.