---Advertisement---
यावल : वाघझीरा गावातील एक तरुण हा बैलांना आंघोळीसाठी खदानीत घेऊन गेला होता. यावेळी त्याचा खदानीच्या पाण्यात बुडून मृत्यू ओढावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.राजु नबाब तडवी (वय ४० वर्ष रा. वाघझिरा ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे.
राजू तडवी हा वाघझिरा गावात आपल्या कुटुंबासह राहतो. मोलमजुरी करुन तो उदरनिर्वाह करतो. सोमवार, २ सप्टेंबर रोजी वाघझिरा शिवारातील चैनसिंग खजान बारेला यांच्या शेतातील खदानीच्या पाण्यात राजु तडवी हा त्याच्याकडील बैलांना अंघोळ घालण्यासाठी घेऊन गेला होता. बैलांची अंघोळ झाल्यावर बैलांना हाकलून बाहेर काढत असतांना त्याचा पाय घसरून तो खदानीत जााऊन पडला. ग्रामस्थांनी राजु तडवी यास खदानीतून दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले. तत्काळ त्यास एका खाजगी वाहनाने किनगाव येथील रूग्णालयात आणले.
वैद्यकीय अधिकारी यांनी तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्याचे सांगितले. त्या ठिकाणी वैद्यकिय अधिकारी यांनी राजु तडवी यांची तपासणी करीत त्यास मृत घोषीत केले. या बाबत मयत राजु तडवी यांचे मामा अकबर बाबु तडवी यांनी खबर दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास यावल पोलीस करीत आहे .