---Advertisement---
जामनेर : घराबाहेर काम करणाऱ्या तरुणाला दंश केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राजू संतोष गायकवाड (२०, रा. गारखेडा ) असे मयत तरुणाचे नाव आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे राजू हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. दरम्यान , घराबाहेर काम करत असताना राजुला आडोशाला असेलल्या सापाने दंश केला. यावेळी राजुला काहीतरी चावल्याचे जाणवलं. त्याच्या हाताची आग होऊ लागली.
हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी राजुला प्राथमिक उपचारार्थ जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तब्येत जास्त खालावल्यामुळे राजुला जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
मयत राजू हा शेतीकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्यामुळे राजुच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान, सर्पतज्ज्ञांच्या माहितीनुसार साप चावण्याच्या खुणावरून नाग जातीचा साप असल्याचा अंदाज व्यक्त आहे.