---Advertisement---
छत्तीसगडमधील बस्तर येथे शुक्रवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी एका चकमकीत ३६ नक्षलवाद्यांना टिपले. यासोबतच २०२४ या वर्षात आतापर्यंत मारल्या गेलेल्या नक्षल्यांची संख्या १७१ वर पोहोचली आहे.
ही चकमक नारायणपूर- दंतेवाडादरम्यानच्या थुलथुली आणि नेंद्र गावाजवळच्या माडच्या जंगल परिसरात दुपारी एकच्या सुमारास झडली. या मोहिमेत जिल्हा राखीव पोलिस दल आणि विशेष कृती दलाचे जवान सहभागी झाले होते. हे वृत्त लिहिस्तोवर चकमक सुरूच होती.
या परिसरात नक्षली लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यांनी या माहितीच्या आधारे जंगलात सापळा रचला आणि ते माडच्या परिसरात पोहोचले. तेथे त्यांनी नक्षल्यांच्या संशयित परिसराला घेराव घालताच नक्षल्यांकडून गोळीबार सुरू झाला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात सुरुवातीला ७, नंतर १४ आणि शेवटी ३६ नक्षली ठार झाल्याचा आकडा समोर आला.
---Advertisement---

३६ पैकी बहुतांश नक्षल्यांचे मृतदेह हाती लागले. मात्र, यानंतर हे क्षेत्र सुरक्षित आहे. याची खात्री करण्यासाठी आणि उर्वरित नक्षलवाद्यांच्या उपस्थितीबद्दल आणखी माहिती गोळा करण्यासाठी ऑपरेशन सुरू ठेवत असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.
मृतदेहांसह मोठा शस्त्रसाठा जप्त
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत मारल्या गेलेल्या बहुतांश नक्षल्यांचे मृतदेह हाती लागले असले तरी, त्यांची ओळख पटविण्यात आलेली नाहीतसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने विविध परिसरात नक्षल्यांचा बीमोड करण्याची कारवाई सुरक्षा दलाकडून केली जात आहे. नक्षलवादाचा संपूर्ण नायनाट करणार, या संकल्पाचा गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वीच पुनरुच्चार केला होता. आता त्यानुसार कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वर्षात १७१ नक्षल्यांना ठार करण्यात आले आहे. ही आकडेवारी एकट्या बस्तरमधील असत्याचे पोलिसांनी सांगितले.