---Advertisement---
जळगाव : कुलूपबंद घरावर चोरट्यांची वक्रदृष्टी पडताच ते घर हमखास फुटते. घराच्या दरवाजाला कुलूप दिसताच चोरट्यांनी ते तोडत आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील सामान अस्तव्यस्त करत सोनेचांदीचे दागिने तसेच रोकड असा सुमारे १ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना दि ६ ऑक्टोबर (रविवार) रोजी दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान भरदिवसा रामानंदनगर परिसरातील श्रद्धा कॉलनी येथे घडली.
पराग जगन्नाथ चौधरी ( रा. प्लॉट नं. १०, स्वर्ण हाईट्स श्रद्धा कॉलनी) हे व्यावसायिक आहेत. रामानंदनगर प्लॉट नं. १२ अ याठिकाणी त्यांचे निवास आहे. रविवारी ते घराच्या दरवाजाला कुलूप लावून दुपारी एक वाजता ते घराबाहेर कामानिमित्त गेले. त्यानंतर ते दुपारी तीन वाजता पुन्हा आले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेला होता. कपाटातील सोनेचांदीचे दागिने तसेच सुमारे १६ हजार ५०० रुपयांची रोकड असा सुमारे १ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी घेत पोबारा केला. त्यांनी तत्काळ माहिती रामानंदनगर पोलिसांना दिली.
पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी घटनास्थळी पाहणी केली. परिसराती सीसीटीव्ही कॅमेराचा शोध घेत फुटेज घेण्याचे त्यांनी पोलिसांनी सुचित केले. या प्रकरणी तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपस सपोनि रोहिदास गभाले हे करीत आहेत. बंद घरफोडी तसेच दुचाकी चोरुन नेण्याच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. चोरट्यांना कसले भय वाटत नसल्याचे चोरीच्या वाढत्या घटनांवरुन वास्तव समोर आले आहे.