---Advertisement---
IPL Auction 2025 : आयपीएलच्या 18 व्या हंगामासाठी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे दोन दिवसीय मेगा लिलाव पार पडला आहे. या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना मोठ्या बोली लागल्या. ऋषभ पंत हा आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. या मेगा ऑक्शनमध्ये जितची चर्चा पंतची झाली, तितकीच चर्चा ही 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी याचीही झाली.
वैभव हा आयपीएलच्या लिलावात सहभागी होणारा सर्वात युवा खेळाडू होता. त्यामुळे त्याच्यावर बोली फ्रँचायझी लावणार की नाही अशी शंकाही व्यक्त होत होती. पण त्याला कोट्यवधी रुपयांची बोली लागली आहे. ३० लाख मुळ किंमत असलेल्या वैभवाला राजस्थानने १.१० कोटी रुपयात आपल्या संघात सामील केले आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये बोली लागलेला सर्वात लहान खेळाडूही आहे. आता जर त्याला राजस्थानने प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली, तर त्याला पदार्पणाचीही संधी मिळेल.
कोण आहे वैभव सूर्यवंशी?
वैभवचा जन्म २७ मार्च २०११ मध्ये बिहारमधील समस्तीपूर येथे झाला आहे. वैभवने गेल्या काही महिन्यात त्याच्या कामगिरीने अनेकांना प्रभावित केले आहे. त्याने वयाच्या १२ व्या वर्षीच जानेवारी २०२४ मध्ये बिहारसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते. तो रणजी खेळणारा सर्वात लहान खेळाडूही ठरला आहे. त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाच्या युवा संघासोबत झालेल्या कसोटी मालिकेसाठीही भारताच्या १९ वर्षांखालील संघात निवडले होते. त्याने त्या मालिकेत शतकही केले होते. त्यामुळे व्यावसायिक क्रिकेटमध्ये शतक करणारा तो सर्वात युवा खेळाडूही होता.
वैभव सूर्यवंशी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये बिहारचं प्रतिनिधित्व करतो. वैभवने अवघ्या काही दिवसांपूर्वी रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई विरुद्ध पदार्पण केलं होतं. वैभवने आतापर्यंत 5 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 100 रन्स केल्या आहेत. तसेच 1 विकेटही घेतली आहे. तलेच वैभवने राजस्थानविरुद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतून टी20 डेब्यू केलं.
वयाबाबत शंका ?
दरम्यान, त्याच्या वयाबाबत सध्या शंका उपस्थित केली जात आहे. त्याची कामगिरी पाहाता कदाचित त्याने वयचोरी केल्याचंही म्हटलं जात आहे.
त्यावर आता त्याचे वडील संजीव सुर्यवंशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजीव यांनी पीटीआयला सांगितले की ‘जेव्हा तो साडे आठ वर्षांचा होता, तेव्हा त्याने पहिल्यांदा बीसीसीआयची बोन टेस्ट दिली होती. त्याने आधीच भारताच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळवलं आहे. आम्हाला कोणाचीही भिती नाही. तो यापुढेही टेस्ट द्यायला तयार आहे.’ असं संजीव सुर्यवंशी यांनी म्हटलं आहे.