जळगाव । मंगरूळ (ता. अमळनेर) येथील एमआयडीसी परिसरात आज शुक्रवारी सकाळी तुषार चिंधू चौधरी (३७) या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. दरम्यान, तरूणाचा खून अनैतिक संबंधातून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सागर चौधरीसह मृत तरुणाच्या पत्नीला अटक केलीय.
पोलीस सूत्रानुसार, अमळनेर शहरातील प्रताप मील परिसरात तुषार चिंधू चौधरी हा तरुण आपल्या परिवासह वास्तव्यास होता. गुरूवार, ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास तुषार हा मित्र सागर चौधरीसोबत अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गेले; दोघांनीसोबत दारू पिली. यावेळी दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरून जोरदार वाद झाला. या वादातून सागर चौधरी याने तुषारच्या डोक्यात दगड टाकून त्याचा निर्घृण खून केल्यानंतर फरार झाला.
दुसरीकडे, तुषार घरी न पोहचल्याने त्याचा शोध सुरु होता. आज शुक्रवारी सकाळी मंगरूळ (ता. अमळनेर) येथील एमआयडीसी परिसरात त्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला.
तुषारच्या डोक्यात गंभीर घाव असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सागर चौधरी यास ताब्यात घेतले. दरम्यान, त्याने हा खून अनैतिक संबंधातून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपी सागर चौधरीसह मृत तरुणाच्या पत्नीला अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.