Jalgaon News: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जळगाव ग्रामीण मधील पराभूत उमेदवार तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा अजित पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. गुलाबराव देवकर हे एक प्रभावशाली नेते आहेत. अजित पवार गटात त्यांच्या प्रवेशामुळे राजकीय घडामोडींमध्ये नवीन वळण येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीला मोठे यश मिळाले आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात सुरू झालेली पक्षांतराची मालिका अद्याप संपलेली नाही. राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याशी दीर्घकाळ एकनिष्ठ राहिलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेऊन स्वत: राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटात जाण्याची पुष्टी केली.
जळगाव ग्रामीण मतदारसंघातून देवकर यांचा पराभव
गुलाबराव देवकर यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीतील या पराभवानंतर देवकरांनी अजित पवार गटाकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
तटकरेंसोबत सकारात्मक चर्चा गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत देवकर यांनी सुनील तटकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली. या भेटीदरम्यान, देवकरांनी गटात सामील होण्याची तयारी दर्शवली असून, तटकरे यांनीही त्याच्या प्रवेशाबाबत सकारात्मकता व्यक्त केली आहे. यामुळे आता त्यांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी फायदा होणार का? हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातून शरद पवार गटाला हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.
गुलाबराव देवकर यांची प्रतिक्रिया
पक्षांतराबाबत माध्यमांशी बोलताना गुलाबराव देवकर म्हणाले की, आम्ही अनेक वर्षांपासून सत्तेपासून दूर आहोत, त्यामुळे कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, ते आमच्यापुढे अनेक समस्या निर्माण करत आहेत. देवकर यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली, त्यात कार्यकर्त्यांनी त्यांना सत्तेत सहभागी व्हावे, असे सुचविले. कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून ते ९ डिसेंबरला अजित पवार यांच्या गटात सामील होणार आहेत. याबाबत त्यांनी सुनील तटकरे यांच्याशी चर्चाही केली आहे. गुलाबराव देवकर म्हणाले की, आपण शरद पवारांचा गट सोडत असले तरी अद्याप या विषयावर त्यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही.
तथापि, अजित पवार गटात गुलाबराव देवकर यांच्या प्रवेशाबद्दल अधिकृतपणे काही घोषणा झालेली नाही. त्यांचा गटात प्रवेश होईल का, हे काही कालावधीनंतरच स्पष्ट होईल.