महाभारतातील कौरव विरुद्ध पांडवांच्या कुरुक्षेत्रावरील युद्धात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. आध्यात्मिक आणि तात्विक पातळीवरही अनन्यसाधारण महत्त्व लाभलेला हा ग्रंथ व्यवस्थापकीय कौशल्याच्या दृष्टिकोनातूनही तितकाच मार्गदर्शक ठरावा. तेव्हा, नुकत्याच संपन्न झालेल्या गीताजयंतीनिमित्ताने श्रीमद्भगवद्गीता व आधुनिक व्यवस्थापनाची सांगड घालणारा हा चिंतनशील लेख…
महाभारताच्या पार्श्वभूमीवर व प्रत्यक्ष युद्धभूमीवर अर्जुनाला मोह, भ्रम, अनिश्चितता यातून बाहेर पडून भयमुक्त होऊन युद्धाला सामोरे जाण्याचा संदेश व प्रेरणा देणारी ‘श्रीमद्भगवतगीता’ म्हणजे आधुनिक व्यवस्थापन व व्यवस्थापनशास्त्र या उभय क्षेत्रात सर्व संबंधितांना मार्गदर्शन करणारा व्यवस्थापन ग्रंथ होय. गीतेचा प्रत्येक अध्याय व श्लोक व्यक्तिगतच नव्हे, तर व्यवस्थापकीय स्तरावर देखील तितकाच मार्गदर्शक ठरतो. याचा उपयोग गीतेचे अभ्यासक-अनुयायांना केवळ नोकरी-रोजगारच नव्हे, तर करिअर व्यतिरिक्त व व्यक्तिगत व सामाजिक जीवनातील प्रगतीसाठी उपयुक्त ठरते.
सकृतदर्शनी पाहता, पांडवांपेक्षा कित्येक पटीने अधिक सैन्य व भीष्म, द्रोण, कर्ण यांसारखे अजेय बाहुबली कौरवसेनेत असताना पण, केवळ आपले लक्ष आणि उद्दिष्ट यावरच लक्ष केंद्रित करून संघर्षपूर्ण व आव्हानपर परिस्थितीवर मात करून उद्दिष्टप्राप्ती कशी केली जाऊ शकते, याचा चिरकालीन व प्रेरणादायी संदेश गीतेतूनच मिळू शकतो.
व्यवस्थापन पद्घतीच्या चाकोरी वा रचनेमध्ये मनुष्य म्हणजेच कर्मचारी हा नेहमीच महत्त्वाचा घटक असतो. अगदी प्रगत तंत्रज्ञानासह व्यवसाय प्रक्रियेमध्ये सुद्धा मनुष्याचे कामकाज, विचार व विचारशक्ती, व्यक्तीचा स्वभाव, संवादशैली, कार्यक्षमता, नेतृत्व शैली, समन्वय साधण्याची वृत्ती या मुख्यत: मनुष्याशी निगडित असणार्या बाबी नेहमीच महत्त्वाच्या ठरतात. याउलट वर वानगीदाखल नमूद केलेल्या मनुष्य आणि त्याच्या स्वभावाशी निगडित असणार्या बाबी पुरेशा प्रमाणात नसणारी व्यक्ती अपेक्षित यश साध्य करू शकत नाहीत.
सर्वसाधारणपणे व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञांच्या मते, व्यवसाय-व्यवस्थापन प्रक्रियेला खर्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी व्यक्ती व व्यक्ती समूह अधिकाधिक सक्षमपणे व यशस्वी पद्धतीने काम करणे ही बाब सर्वोपरी ठरत असते. नेमकी हीच बाब गीतेमध्ये ‘योग: कर्मसु कौशलम्’ या सूत्रामध्ये सांगितली आहे. याचाच अर्थ म्हणजे, आपले कार्य आणि कामकाज यामध्ये अधिक कौशल्य वा कुशलता प्राप्त करणे हेच यशस्वी जीवनाचे लक्ष असायला हवे.
त्याचप्रमाणे गीतेला काम आणि कार्य याप्रती समर्पण भावनेचे जनक मानले जाते. गीतेमध्ये हीच भाव-भूमिका महत्त्वाची ठरते. याचे कारण, गीता तत्त्वज्ञानात काम करणार्यांचे त्यांच्या कामाप्रती संपूर्ण समर्पण असावे, यावर भर दिला जातो व त्याचे सकारात्मक परिणाम होत जातात. व्यवस्थापन क्षेत्रात ज्याला ‘मॅनेजमेंट बाय ऑबजेक्टिव्हज’ म्हटले जाते, त्या व्यवस्थापन संकल्पनेचे मूळ ‘ध्येय साधना’ स्वरूपात दिसते, हे लक्षणीय आहे.
याशिवाय भगवद्गीतेतील विविध अध्याय, श्लोक इत्यादींमध्ये नमूद केलेले दृष्टांतवजा विवेचन-मार्गदर्शन इ. मुद्दे युवावर्गाला शिक्षण-रोजगारापासून जीवन वा व्यवसायातील प्रगती त्यासाठी आवश्यक अशी कौशल्यप्राप्ती यश मिळविण्यासाठी विविध आव्हानांचा करावा लागणारा यशस्वी सामना यासाठी जे मार्गदर्शक-विवेचन केले आहे, त्याचा प्रमुख गोषवारा पुढीलप्रमाणे-
आळस व भीतीचा त्याग करणे : भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या दुसर्या अध्यायातील तिसर्या श्लोकात नमूद केल्यानुसार, ’क्लैब्यं मा स्म गमः म्हणजेच व्यक्तीने यशप्राप्तीसाठी आपल्या आयुष्यातील आळस व भीती म्हणजेच दुबळेपणाचा त्याग करणे आवश्यक ठरते. यातून व्यक्तीला आपल्या स्वत:मधील सामर्थ्याची नव्याने जाणीव होते. पुढे श्रीकृष्णांनी म्हटल्यानुसार, ‘क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप’ म्हणजे आपल्या हृदयात व्याप्त तुच्छ दुबळेपणा, कमजोर प्रवृत्ती इ.चा त्याग केल्याशिवाय मनुष्याला यशाच्या पायरीवर सुद्धा पाय राखणे शक्त होत नाही. व्यावसायिक जीवनाचा हाच तर मूलमंत्र आहे.
जीवनातील अविचलपणा : दीर्घकालीन उद्दिष्टासह यशप्राप्ती करायची असेल, तर जीवनात सातत्य हवे. अस्थिर व चंचल मनोवृत्ती याठिकाणी उपयोगाची नसते. गीतावचनानुसार, ‘गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः’ म्हणजेच हर्ष वा शोक याहून दूर राहून प्रत्येक स्थितीत तटस्थ वा भयस्थ वृत्तीने आपण पुढेच मार्गक्रमण करायला हवे. याशिवाय ‘समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते’ अर्थात अपयशापोटी होणारे दुःख अथवा यशामुळे प्राप्त होणारा आनंद दोन्हीकडे समानसूत्र व समान भूमिकेतून पाहायला शिकले की, यशप्राप्तीचा मार्ग सहजपणे गवसतो.
स्थिर बुद्धीसह ध्येय साधना : गीतेतील विशेष व्यवस्थापनतत्त्व म्हणजे, जीवनातील यशापयशानुसार व्यक्तीने गौरवान्वित वा हताश होऊ नये. उलट व्यवस्थापकाने नेहमीच स्थिर बुद्धीसह ध्येयप्राप्तीच्या दिशेकडे अग्रेसर व्हायला हवे. श्रीकृष्णांनी नमूद केल्यानुसार आपल्या ध्येयानुरूप इच्छित फलप्राप्तीमध्येच यशस्वी जीवनाचे सार आहे. पवित्र मन व उद्देशांसह सुरू केलेले प्रत्येक काम हे यशस्वी होतेच. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यवस्थापकाने आपल्या उद्देश आणि उद्दिष्टांप्रती व त्यांच्या प्राप्तीसाठीच निर्धारित व नियोजित असायला हवे.
एकाग्र चित्त व संपूर्ण समर्पण : श्रीकृष्णांनी म्हटल्यानुसार, मानवी जीवन हे मन आणि आत्मा यामध्ये असणारे एक द्वंद्व स्वरूपाचे आहे. त्यांच्यानुसार मनुष्याला आपले मन वा चित्त स्थिर ठेवून प्राप्त परिस्थितीचे विश्लेषण-विवेचन करायला हवे. त्याचवेळी मनुष्य योग्य वा संयत निर्णय घेऊ शकतो. ही बाब व्यवस्थापन क्षेत्र वा व्यवस्थापक या उभयतांना चपखळपणे लागू होते. याचाच पुढचा व मार्गदर्शक टप्पा म्हणजे, ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हा गीतेतील श्लोक म्हणजे, व्यक्ती म्हणून व्यवस्थापकाने आपल्या कर्म म्हणजेच कामाची चिंता न करता, आपल्या कर्तव्य व कर्तव्यपरायणतेचा मार्ग चोखाळायला हवा.
संस्थागत व संघटनेच्या हिताचेच काम : श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपल्या स्वतःशी संबंधित व मर्यादित स्वरूपातील मुद्द्यांपेक्षा सर्वांच्या म्हणजेच समाजहिताचा विचार करून निर्णय घेण्यासाठी प्रेरित केले. याचाच अर्थ संस्था-संघटना अथवा व्यवसायाच्या संदर्भात निर्णय घेताना स्वतःचे नव्हे, तर सर्वांचे व्यापक हित लक्षात घेऊन निर्णय घेणेच निर्णायक क्षणी महत्त्वाचे असते. एवढेच नव्हे, तर सर्वांच्या व्यापक हितात व्यक्तिगत हित सामावलेले असते, हा महत्त्वाचा बोध पण यातून होतो.
आपले काम आपली ओळख : गीतेतील प्रत्येक व्यक्तीपासून व्यवस्थापक-व्यवस्थापनापर्यंतच्या सर्वांसाठी असणारा महत्त्वाचा बोध म्हणजे कुठल्याही व्यक्तीची ओळख त्याचे कुटुंब-जाती वा पंथ यानुसार नव्हे, तर त्याचे कर्म म्हणजेच कामकाजावर आधारित असायला हवी. यासाठी परस्पर संबंध व कार्याधारित व्यवहार या मुद्द्यांवर भर दिला गेला आहे. व्यवस्थापकांच्या कामकाज, व्यवहार व कार्यबद्धता इ. संदर्भात हे मुद्दे आजही लागू होतात.
सतत निरंतर प्रयास : व्यवस्थापनाच्या संदर्भात सातत्यपूर्ण प्रयत्नांना पर्याय नसतो. प्रसंगी व्यवसाय-व्यवस्थापनातील चढ-उतार वा यशापयशाचा सामना करूनच अपेक्षित यश निश्चितपणे मिळत असते. त्यामुळे अपेक्षित यश न मिळाल्यास निराश न होता मार्गक्रमण करावे, याची प्रेरणाच भगवद्गीतेतून मिळते.
बदल आणि बदलांबद्दल : बदल ही निरंतर होणारी प्रक्रिया आहे. ही बिरूदावली निरंतर वापरली जाते. व्यवस्थापनांतर्गत तर आज एक विशेष व आवश्यक बाब म्हणून ‘बदलांचे व्यवस्थापन व व्यवस्थापनातील बदलाचे महत्त्व’ यावर विशेष भर दिला जातो.
यासंदर्भात तर श्रीकृष्णांनी गीतेत नमूद केलेली बाब म्हणजे, बदलांपासून वा बदलाला सामोरे जाताना घाबरणारी व्यक्ती प्रसंगी अनावश्यक वा अनैतिक कार्य करण्यास प्रवृत्त होते. ही बाब व्यवस्थापकांनी प्रकर्षाने टाळायला हवी. या आणि यांसारख्या अनेक व्यावहारिक दृष्टांतांसह आपल्याला भगवद्गीतेतून व्यवस्थापन पद्धतीचे नेमके व मार्गदर्शक दर्शन होते.
दत्तात्रय आंबुलकर